डांबर कमी, खड्डे जास्त, सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील विलवडेतील स्थिती, बांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:30 IST2017-12-05T15:26:56+5:302017-12-05T15:30:36+5:30

विलवडे रस्त्यावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. (महेश चव्हाण)
ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शासनाचे वेळकाढू धोरण आणि ठेकेदारांना दरवर्षी दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अशी परंपरा गेली पाच वर्षे सुरू आहे.
दरवर्षी पावसानंतर या मार्गावर काळ्या डांबराची लाल माती होते. चर-खड्डे तर रोजच्या प्रवासातील एक भाग झाले आहेत. ग्रामस्थांचा रोष ओढवला की खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पावसाळ्यात परिस्थिती पुन्हा जैसे थै. त्यामुळे या मार्गाचे सक्षमरित्या डांबरीकरण होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होत आहे.
बांदा-दाणोली मार्गाचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. जवळपास १५ कोटीहून अधिक निधी त्यासाठी खर्ची घालण्यात येणार होता. यामध्ये सरमळे, बावळाट, दाणोली तसेच वाफोली-बांदा या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरण झाले. पण विलवडे येथील सुमारे तीन ते चार किलोमीटरचा पट्टा रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामस्थांच्या समाधानासाठी दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जातात. मात्र रूंदीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत.