Sindhudurg: गावपळणीसाठी शिराळे निर्मनुष्य!, दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:06 IST2025-01-09T18:06:15+5:302025-01-09T18:06:33+5:30

गावकुसाबाहेर सडुरेत राहुट्यांची उभारणी : कडाक्याच्या थंडीतही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह

As the village migration started Shirale villagers stayed at the foothills of Daundoba mountain | Sindhudurg: गावपळणीसाठी शिराळे निर्मनुष्य!, दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांचा मुक्काम

Sindhudurg: गावपळणीसाठी शिराळे निर्मनुष्य!, दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी गावकऱ्यांचा मुक्काम

वैभववाडी : शिराळेवासियांनी गुरे-ढोरे, पाळीव प्राणी, पक्ष्यांसह बुधवारी (दि. ८) सायंकाळी गाव सोडला. त्यामुळे निर्मनुष्य झालेले गाव सुनेसुने झाले आहे. ‘वार्षिक गावपळण’ सुरू झाल्याने पुढचे चार-पाच दिवस गावकऱ्यांचा मुक्काम सडुरेतील दौंडोबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावपत्थर येथील राहुट्यांमध्ये असणार आहे. सध्या कडाक्याची थंडी असली, तरी पूर्वजांनी सुरू केलेल्या वार्षिकासाठी गाव सोडताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसला.

साडेचारशे वर्षांपूर्वीपासून सुरू असलेली शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा आताही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे. दरवर्षी होणाऱ्या  या गावपळणीबद्दल अनेकांना कुतूहल आणि उत्सुकता आहे. एरव्ही शांत असणाऱ्या गर्द वनराईने नटलेला हा परिसर शिराळेवासीयांच्या आगमनाने गजबजून गेला आहे. गावकऱ्यांनी सोबत आणलेल्या गुरा-ढोरांचेही वास्तव्य तेथेच असणार आहे. शाळा, अंगणवाडीही येथेच भरते. त्यामुळे एरव्ही ‘चार भिंतींच्या आत’ शिकणाऱ्या चिमुकल्यांना उघड्यावर निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यासाचे धडे गिरवण्याचा आनंद लुटायला मिळतो.

आठवडाभर पुरेल इतक्या शिदोरीचे गाठोडे डोक्यावर घेऊन गावकऱ्यांनी दुपारी ३ वाजल्यापासून राहुट्यांच्या दिशेने प्रवास सुरू केला. कुटुंबातील कर्ती माणसे पाळीव प्राणी, पक्षी घेऊन राहुट्यांच्या दिशेने निघाले. तर वयोवृद्ध, लहान मुले व महिलांनी साहित्य घेऊन ‘एसटी बस’ने वास्तव्याचे ठिकाण गाठले. सायंकाळी उशिरापर्यंत गावकरी राहुट्यांकडे येतच होते. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी आल्यामुळे राहुट्यांचा परिसर गजबजून गेला असून, एक वेगळे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, पुण्यातील गावकरी मंडळी होणार सामील

शिराळेच्या वार्षिक ‘गावपळण’ प्रथेबाबत काही आख्यायिका सांगितल्या जातात. मात्र, सध्याच्या पिढीकडून गावपळणीबद्दल विविध मतप्रवाह ऐकायला मिळत असले, तरी या गावपळणीला आता उत्सवाचे रूप येऊ लागले असून, गावकरी मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी करतात. या काळात मुंबई, पुण्यासह विविध शहरांत गेलेली गावकरी मंडळीही या कालावधीत गावपळणीत सामील होत आहेत.

शिराळेच्या गावपळणीचे परराज्यातही कुतूहल

शिराळेची वार्षिक गावपळण संपूर्ण राज्यासह लगतच्या गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गावपळणची पद्धत आणि रितीरिवाज पाहायला दरवर्षी विविध भागांतून लोक येत असतात. जिल्ह्यातील विविध संस्था, अभ्यासक याठिकाणी भेट देऊन ही प्रथा, परंपरा कशी सुरू झाली? त्यानंतर होत गेलेला बदल, आताच्या पिढीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदींचा मागोवा घेत असतात.

Web Title: As the village migration started Shirale villagers stayed at the foothills of Daundoba mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.