सतीश सावंत यांना अटक करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांची पोलिसांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 16:06 IST2021-12-30T15:59:59+5:302021-12-30T16:06:17+5:30
कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. यावर संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची झाली.

सतीश सावंत यांना अटक करा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांची पोलिसांकडे धाव
सिंधुदुर्ग : आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. मतदान केंद्रावर घडलेल्या प्रकार व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानस्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सतीश सावंत यांना अटक करा अशी मागणी संजना सावंत यांनी पोलिसांकडे केली आहे.
कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. यावर संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचबाची झाली. यावेळी सतीश सावंत यांनी आक्षेपार्ह शब्दाचा उच्चार केला. याबाबत संजना सावंत यांनी पोलीस ठाणे गाठून आक्षेपार्ह विधान व अपमानजनक वागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. तर, सतीश सावंत यांना अटक करा अशी मागणी देखील केली.
सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयाबाहेर विकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.