२०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:10 IST2020-11-10T15:08:42+5:302020-11-10T15:10:42+5:30
fishrman, udaysamant, sindhudurgnews वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

अखिल मच्छिमार कृती समितीमार्फत पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.
मालवण : वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय केळुसकर यांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांसह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना सादर केले. तसेच गतवर्षीच्या नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ६५ कोटी रुपयांच्या मत्स्य पॅकेजसाठीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करून मच्छिमार संस्थेचा सभासद असलेल्या मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक सदस्यास पॅकेजचा लाभ द्यावा.
कुणालाही आर्थिक पॅकेजपासून वंचित ठेऊ नका. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्या पारंपरिक मच्छिमारांवर दाखल असलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत याविषयीसुद्धा अखिल मच्छिमार कृती समितीमार्फत निवेदन देण्यात आले.