..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले
By सुधीर राणे | Updated: November 22, 2022 18:25 IST2022-11-22T18:24:30+5:302022-11-22T18:25:44+5:30
वेशीबाहेर असलेल्या ग्रामस्थांना गाव भरण्याची होती प्रतिक्षा

..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले
आचरा: श्री देव रवळनाथाचा कौल मिळताच चिंदर गाव आज, मंगळवारी पुन्हा गजबजला. निसर्गाच्या सानिध्यात थाटलेले आपले संसार पुन्हा एकत्र करीत गावाकऱ्यांची पावले आपल्या घराच्या दिशेने वळली. शेकडो वर्षापासून परंपरा जपणाऱ्या गावपळण पुर्ण झाल्याचा कौल मिळताच चार दिवसांनी गावकरी गुराढोरासह पुन्हा गावात परतले.
ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून परत गाव गाठला आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरिता कौल मिळाल्याने १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गावपळण पार पडली. सोमवारी दुपारी देवाचा कौल न झाल्याने मंगळवारी दुपारी देवाचा कौल झाल्यावर गाव भरण्यास सुरुवात झाली होती. चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ हे गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले होते.
चिंदर गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिबंक येथे चिंदरवासीय झोपाड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकऱ्यांनी घेतला. चार रात्रीच्या मुक्कामानंतर देव रवळनाथचा कौल झाल्याने चिंदरवासीय आज मिळेल त्या वाहनाने आपल्या घराकडे धाव घेतली. तर काहीजणांनी आपला रानात थाटलेला संसार गोळा करून पायी चालत घर गाठले.
चार दिवस सुनसुन झालेले गाव पुन्हा गजबजले
शुक्रवारपासून गावपळणीमुळे वेशीबाहेर असलेल्या चिंदर ग्रामस्थांना सोमवारी गाव भरण्याची प्रतिक्षा होती. मात्र देवाने कौल दिला नसल्याने वेशीबाहेर एक दिवसाने मुक्काम वाढला होता. आज, मंगळवारी गाव भरण्याचा कौल मिळताच ग्रामस्थ गावात आले व गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. चिंदर गाव गेले चार दिवस शांत असणारा गाव पुन्हा गजबजला आहे.