नववर्षांचे स्वागत आटपून कुडाळकडे जाताना अपघात; तरुणीचा मृत्यू
By अनंत खं.जाधव | Updated: January 1, 2024 21:23 IST2024-01-01T21:22:44+5:302024-01-01T21:23:26+5:30
युवतीचा मृत्यू : सावंतवाडीजवळ कार झाडाला आदळली

नववर्षांचे स्वागत आटपून कुडाळकडे जाताना अपघात; तरुणीचा मृत्यू
सावंतवाडी : थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागतासाठी सावंतवाडीत आलेल्या मित्रमैत्रिणी कुडाळ च्या दिशेने जाताना पहाटेच्या सुमारास सावंतवाडी जवळ कोलगाव येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला कार आदळून झालेल्या अपघातात ऐश्वर्या महेश कवठणकर (21)ही युवती जागीच ठार झाली तर कार चालकासह तिघेजण जखमी झाले आहेत. अपघात पहाटेच्या सुमारास घडल्यानंतर लागलीच धावाधाव करून चालकासह इतरांना बाहेर काढण्यात पोलिस तसेच नागरिकांना यश आले.
याबाबत माहिती अशी ऐश्वर्या कवठणकर सह तिचा मित्र सिद्धार्थ बांदेकर व सोबत अन्य दोघेजण मिळून चारजण कुडाळ येथून सावंतवाडीत नववर्षाच्या स्वागतासाठी आले होते. नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषी केल्यानंतर सावंतवाडी तून कोलगाव -आकेरी मार्गे कुडाळ येथून घरी परतना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चालक सिद्धार्थ बांदेकर यांची कार भल्या मोठ्या झाडाला आदळली अन् अपघात झाला.कार ऐवढी जोरात आदळली कि परिसरात राहणाऱ्या ना आवाज ऐकू आला त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या सिद्धार्थ च्या मित्रानी फोनाफोनी करून अपघाताची माहिती नातेवाईक व पोलिस यांना दिली या नंतर सिद्धार्थ बांदेकरचे मामा राजू वाळके व त्यांच्या मित्रमंडळाने धाव घेतली झाडाला आदळल्याने गाडीच्या एका बाजूचा चक्काचूर झाला होता. त्यामुळे जखमींना गाडीतून बाहेर काढताना चांगलीच दमछाक झाली गाडीत असलेल्या ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती या सर्वांना गाडी बाहेर काढण्यात आले. आणि पोलिसांच्या मदतीने सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच ऐश्वर्या हिचा मृत्यू झाला होता.तर सिद्धार्थ बांदेकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकर हिचे वडील ,काका व मित्रमंडळाने धाव घेतली. ऐश्वर्या कवठणकर ही कुडाळ येथे उत्कर्षनगर, रामेश्वर प्लाझा, पिंगुळी येथे राहते. तिच्या मागे आई-वडील भाऊ व दोन काका काकी असा परिवार ऐश्वर्या चे येत्या महिन्यात लग्न होणार होते. मात्र तत्पूर्वीच काळाने ऐश्वर्यावर घाला घातला. दरम्यान या घटनेनंतर कुडाळ परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहे.