जिल्हाध्यक्षपदावर राहण्याची अमित सामंतांची पात्रता नाही, अबीद नाईकांची टीका

By सुधीर राणे | Published: July 8, 2023 05:03 PM2023-07-08T17:03:04+5:302023-07-08T17:03:22+5:30

स्वार्थी राजकारण करत ज्यांनी पक्षाचे वाटोळे केले त्यांनी आमच्यावर बोलण्याची हिंमत करु नये

Amit Samant is not qualified to hold the post of District President, Abid Naik criticizes | जिल्हाध्यक्षपदावर राहण्याची अमित सामंतांची पात्रता नाही, अबीद नाईकांची टीका

जिल्हाध्यक्षपदावर राहण्याची अमित सामंतांची पात्रता नाही, अबीद नाईकांची टीका

googlenewsNext

कणकवली: जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे हेच दुर्दैवी आहे. अशा व्यक्तिची जिल्हाध्यक्षपदी राहण्याची पात्रताच नाही. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असल्याची टिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी अमित सामंत यांच्यावर केली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी अबिद नाईक हे पक्षाचे क्रियाशील सदस्य नसल्याची टीका केली होती. त्या टीकेला नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी पक्षाकडून सदस्य करण्यासाठी दिलेली पुस्तके उशाला घेऊन झोपणाऱ्यांना कोण सदस्य आहेत आणि कोण नाही ते काय कळणार? पक्षाकडून माझ्याकडे देण्यात आलेली पुस्तके सदस्य करुन मी पक्षाकडे जमा केलेली आहेत. त्याची यादीही माझ्याकडे आहे. मी स्वतः पक्षाचा सदस्य असून सन २०२१ ते २०२३ या कालावधीचा सदस्यत्वाच्या अर्जांची प्रत माझ्याजवळ आहे.  जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य कोण आहेत, पदाधिकारी कोण आहेत हे ज्यांना माहीत नाही त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. 

त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत पक्षाने कधीच उभारी घेतली नाही. एकाही ग्रामपंचायतीवर पक्षाचा सरपंच बसू शकला नाही. स्वतःची निवडून येण्याची पात्रता नसणाऱ्यानी आता हवेत गोळीबार करणे थांबवावे. आम्ही पवार कुटुंबीयांशी निष्ठावान आहोत हे सांगण्याची आम्हाला गरज नाही. पक्षाच्या पडत्या काळात आम्ही काम केले त्यावेळी ही मंडळी कुठे होती? आयत्या पिठावर रेगोट्या मारताना स्वार्थी राजकारण करत ज्यांनी पक्षाचे वाटोळे केले त्यांनी आमच्यावर बोलण्याची हिंमत करु नये. जिल्ह्यात एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीची वाताहत केवळ या एका व्यक्तीमुळे झाली आहे, अशी टीकाही नाईक यांनी केली.

राष्ट्रवादी पक्षात गटातटाचे राजकारण करुन खऱ्या कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणापासून लांब ठेवण्याचे काम या मंडळींनी केले. ज्यांना केवळ स्वतःचा स्वार्थ महत्वाचा, स्वार्थापुढे ज्याला पक्षाशी देणेघेणे नाही अशा नीतिमत्ता नसलेल्या माणसांनी आमच्यावर टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील. यापुढे आमच्या बाबतीत वक्तव्य करताना तोंड सांभाळून बोलावे अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही अबीद नाईक यांनी दिला.

Web Title: Amit Samant is not qualified to hold the post of District President, Abid Naik criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.