सावंतवाडीत ‘अभाविप’चे आजपासून अधिवेशन, कोकण प्रांतातून पदाधिकारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:23 IST2024-12-27T13:23:06+5:302024-12-27T13:23:25+5:30
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांत अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली. कोकण प्रांतमधून पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत दाखल ...

सावंतवाडीत ‘अभाविप’चे आजपासून अधिवेशन, कोकण प्रांतातून पदाधिकारी दाखल
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांत अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली. कोकण प्रांतमधून पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत दाखल झाले आहेत. शुक्रवारपासून तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असणार आहेत.
या अधिवेशनामध्ये अभाविप परिवर्तनकारी छात्र आंदोलन, आनंदमय सार्थक छात्र जीवन, विकसित कोकण आणि समृद्ध कोकण ही भाषण सत्रे होणार आहेत. तसेच विविध प्रस्तावांवर चर्चा करून प्रस्ताव संमत केले जाणार आहेत तर या अधिवेशनाच्या निमित्ताने २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता राजवाड्यापासून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभायात्रा शहरामध्ये प्रमुख रस्त्यांवरून जात गांधी चौक येथे पोहोचल्यावर तेथे सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेमध्ये प्रमुख वक्ता ‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल, दिल्ली या मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनामध्ये तीन परिसंवाद होणार असून, त्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनीष जोशी यांच्या उपस्थितीत ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर होणार आहे. यामध्ये कोकण प्रांतातील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. तसेच २८ डिसेंबर रोजी कोकण सागरी सीमा सुरक्षा या परिसंवादामध्ये अनिकेत कोंडाजी, रविकिरण तोरसकर यांच्यासह या विषयात अभ्यास असणारे तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
तसेच ‘समृद्ध कोकण-विकसित कोकण’ या विषयावर दुसरा परिसंवाद होईल. यामध्ये प्रा. मंदार भानुशे, गुरू राणे, श्रीकृष्ण परब, सुनील उकिडवे, मनीष दळवी, असे तज्ज्ञ व्यक्ती या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या परिसंवादात व्यापार उद्योग आवश्यक सुविधा, शेती, बांबू व फळ प्रक्रिया, बँकिंग व नवीन तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
अधिवेशनामध्ये २९ रोजी अभाविप पूर्व कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे. या संमेलनाला माजी मंत्री विनोद तावडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, ‘अभाविप’चे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी हे उपस्थित राहणार आहेत.