कणकवलीत धरणे आंदोलन, एसटीची निवृत्त कर्मचारी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 16:23 IST2020-01-27T16:20:27+5:302020-01-27T16:23:57+5:30
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

कणकवलीत धरणे आंदोलन, एसटीची निवृत्त कर्मचारी संघटना आक्रमक
कणकवली : राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सदानंद आपटे, सचिव मनोहर आरोलकर, प्रकाश साखरे, सदानंद रासम, अशोक राणे, राजन कोरगांवकर, चंद्रकांत जैतापकर, सुधाकर मोरजकर, रमेश धामापूरकर, नरेश राणे, कांता झगडे, प्रदीपकुमार जाधव, एच. बी. पटेल, रविकांत परब, रमेश निकम, सुभाष खोचरे उपस्थित होते.
यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये उपदान कायद्यानुसार सेवानिवृत्तांना उपदानाची रक्कम एक महिन्याच्या आत मिळाली पाहिजे. सोबत कर्मचाऱ्यांना उपदान रकमेचा गोषवारा मिळावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. १ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार मुद्दा क्र. १२ मध्ये विधवा, विधुर यांना मोफत सेवा पास देताना त्यांचे वय ७५ वरून ६५ करण्यात आले.
वास्तविक सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांची पत्नी, पती यांना वयाची अट नाही. तशीच कार्यवाही विधवा, विधुर यांच्याबाबतीत असावी व त्यांनाही सहा महिन्यांचा मोफत प्रवास पास देण्यात यावा. आता महामंडळाने लालपरी व निमआराम बसेस धावताना दिसत नाहीत. त्याऐवजी नवीन नामकरण केलेल्या सर्व राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांमधून विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात यावी.
मोफत पासाची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी असावी. मोफत पास सहा महिने अनुज्ञेय न ठेवता दोन-दोन महिन्यांचे तीन पास देण्यात यावेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती नसल्याकारणाने ते वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असताना त्यांच्याकडून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज न स्वीकारता राजीनामा घेण्यात आला.
त्यांच्या सेवेचा विचार होऊन त्यांना उपरोक्त संदर्भीय मोफत पास देण्यात यावा. म्हणजेच राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांचाही यात समावेश करावा. तसेच वेतनवाढ १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात यावी व त्यापासूनचाच फरक अदा करण्यात यावा. या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.