राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

By सुधीर राणे | Updated: April 21, 2025 17:14 IST2025-04-21T17:13:27+5:302025-04-21T17:14:41+5:30

सावडाव मारहाण प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करणार 

After Rane came back to power the atmosphere of terror increased in Sindhudurg says Vinayak Raut | राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

राणे पुन्हा सत्तेत आल्यानंतर सिंधुदुर्गात दहशतीचे वातावरण वाढले - विनायक राऊत 

कणकवली : सन २०१४ पूर्वी दहशत, अपहरण, मारामारी, खून यासारख्या अनेक घटनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची राज्यात बदनामी झाली होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण होत होती. निवडणूकांमध्ये राज्यात एकमेव संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा म्हणून ओळख होती. हे पाप नारायण राणे आणि त्याच्या लोकांचे होते. सुदैवाने राणेंचा २०१४ मध्ये पराभव झाला, त्यानंतर  २०१४ ते २०२४ पर्यतच्या गेल्या १० वर्षात एक सुसंस्कृत जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राणेंची परत सत्ता आली आहे. त्यामुळे २०१४ पूर्वी सारख्या हत्या, गुंडगिरीच्या, दहशतीच्या घटना होवू लागल्या आहेत. त्याला नारायण राणे व त्यांची मुलेच जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी केला.

कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतिश सावंत, महिला आघाडी प्रमुख मधुरा पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, मज्जिद बटवाले, तात्या निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

राऊत म्हणाले, बिडवलकर खून आणि त्यानंतर सावडाव येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व एका महिलेला अमानुष व क्रुरपणे मारहाण झाली आहे. त्यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला. बिडवलकर खूनाची उकल करुन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपींचा व्हिडिओ वैभव नाईक यांनी व्हायरल केला आहे. त्यात आरोपी बिनधास्तपणे बोलताना दिसत आहे. त्याला कोणाचीच भिती दिसत नाही. त्याने मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक केलेली आहे. या खून प्रकरणातील मुख्य आरोपीची दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपारीची नोटीस प्रांताधिकारी कार्यालयात पडलेली आहे. त्या फाईलचा शोध जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. अशी आमची मागणी आहे.  

सावडाव येथील वैभव सावंत यांच्या कुटुंबियांना आम्ही भेटून आलो. त्यांच्याकडील फाईल्स पाहिल्या तर त्यांच्या गावात चांगल्या प्रकारे कामे झाली पाहिजेत, गावासाठी आलेल्या विकास निधीचा चांगला वापर झाला पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे. मात्र, त्या सावंत कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण झाली.  यासंदर्भात पुन्हा पोलिस अधिक्षकांना आम्ही भेटणार आहोत. या मारहाण प्रकरणी  योग्य ती कारवाई झालेली नाही. कारण या प्रकरणातील आरोपीचे पालकमंत्री आश्रयदाते असल्याने त्यांच्यावर फक्त ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पालकमंत्री, खासदार पाठींबा देत असतील, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे.

सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतात

सावडाव मधील मारहाण प्रकरणात ५ आरोपी आहेत,त्यापैकी दोन आरोपींकडे गावठी बनावटीच्या दोन बंदुका आहेत.  त्यामुळे सावंत दापत्यांची ते कधीही हत्या करु शकतात. यापुढे गावाच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कोणी त्रास दिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असेल.

त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज  

चिपी विमान सेवा बंद आहे, केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायण राणे यांना त्याची आठवण देखील नसेल. भाजपाची सत्ता दिल्ली ते गल्ली पर्यंत आहे. मात्र, ते स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे इतर पक्षातील कार्यकर्त्यांना निधी तसेच इतर गोष्टीचे आमिष दाखवून आपल्या पक्षात घेत आहेत. त्यांना भाडोत्री कार्यकर्त्यांची गरज आहे. आम्ही एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर शेवटपर्यंत अन्यायाविरोधात लढत राहणार आहोत. 

नितेश राणेंच्या 'त्या' वक्तव्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करु

आपल्या पक्षात नसलेल्यांना निधी न देण्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्याबाबत राज्यपालांकडे तक्रार केली आहे. त्यापुढे जावून न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. मंत्री उदय सामंत यांना मी जास्त किंमत देत नाही. रत्नागिरीत आम्ही जोरदार मोहिम आखल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता सिंधुदुर्गात यायला लागले आहेत असेही विनायक राऊत म्हणाले.

Web Title: After Rane came back to power the atmosphere of terror increased in Sindhudurg says Vinayak Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.