थरारक पाठलाग करून आचरा समुद्रात कर्नाटकातील नौकेवर कारवाई, अन्य नौकांनी काढला पळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:50 IST2024-12-25T12:49:44+5:302024-12-25T12:50:39+5:30
बेकायदा मासेमारी करताना रंगेहाथ पकडले

थरारक पाठलाग करून आचरा समुद्रात कर्नाटकातील नौकेवर कारवाई, अन्य नौकांनी काढला पळ
देवगड : सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील आचरा येथील समुद्रात १७ वावांमध्ये (काही किलोमीटर अंतरात) महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करताना देवगड मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेने थरारक पाठलाग करून कर्नाटकातील मलपी येथील परप्रांतीय हायस्पीड नौकेला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी पहाटे २ः३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पकडलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, नौकेवरील मासळीचा लिलाव करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देवगड मत्स्यव्यवसाय विभागाची या महिन्यातील ही तिसरी धडक कारवाई आहे. देवगड समुद्रात गेले अनेक दिवस परप्रांतीय नौकांनी धुमाकूळ घातला होता. ज्यामुळे स्थानिक मच्छीमार त्रस्त झाले होते. ही कारवाई मत्स्यव्यवसाय परवाना अधिकाऱ्यांच्या टीमने केली.
अन्य नौकांनी काढला पळ
देवगड मत्स्य व्यवसाय विभागामार्फत ‘राजभद्र’ या गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालण्यात येत होती. यावेळी आचरा समुद्रात १७ वावांमध्ये कर्नाटकातील मलपी येथील हायस्पीड नौकांचा समूह महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदा मच्छीमारी करीत असल्याचे आढळले. मत्स्य व्यवसाय विभागाने या नौकांचा थरारक पाठलाग केला. यात ‘खुशी-तीन’ नावाच्या मलपी येथील नौकेला रंगेहाथ पकडण्यात यश आले, तर अन्य नौकांनी पळ काढला.
मासळीचा लिलाव
पकडलेली नौका रात्रीच देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. सकाळी नौकेवरील मासळीचा लिलाव करण्यात आला. या नौकेत कोळंबी, सुरमई, सरंगा, बांगडा, म्हाकुल, कटल आदी प्रकारची मासळी होती. या नौकेवर दंडात्मक कारवाईसाठी प्रतिवेदन सादर करण्यात येणार आहे.