कळणे येथे अपघात; गोव्याची वृद्धा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:34 IST2019-12-18T15:33:15+5:302019-12-18T15:34:16+5:30
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार पलटी होऊन झालेल्या अपघातात कासारपाल-गोवा येथील पुष्पगंधा पुंडलिक पेडणेकर (६०) या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कळणे येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

कळणे येथे कार उलटून अपघात झाला.
दोडामार्ग : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात कासारपाल-गोवा येथील पुष्पगंधा पुंडलिक पेडणेकर (६०) या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात कळणे येथे मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
चिनार पुंडलिक पेडणेकर हे आपली पत्नी व आई यांना घेऊन कोल्हापूर येथे चार दिवसांसाठी देवदर्शनासाठी गेले होते. मंगळवारी ते परतले. येताना ते कुडाळ येथे आपल्या नातेवाईकांकडे थांबले होते. त्यांची पत्नी नातेवाईकांकडेच थांबली. तर आईला सोबत घेऊन पेडणेकर घरी येण्यास निघाले.
कळणे येथे आले असता त्यांचा कारवरील ताबा सुटला व गाडी उलटली. या अपघातात त्यांची आई पुष्पगंधा पेडणेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पेडणेकर कुटुंबीय मूळ घोटगेवाडी-दोडामार्ग येथील असून काही वर्षांपासून ते कासारपाल-गोवा येथे स्थायिक झाले आहेत.