संधी समजून आव्हान स्वीकारले
By Admin | Updated: May 13, 2015 00:51 IST2015-05-12T23:48:28+5:302015-05-13T00:51:58+5:30
रविकिरण तोरस्कर : गोव्यातील मच्छिमारांचा सिंधुदुर्गात मासे खरेदी बंदचा निर्णय

संधी समजून आव्हान स्वीकारले
मालवण : सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार व गोव्यातील पर्ससीन ट्रॉलर्स यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मत्स्य व्यावसायिकांनी सिंधुदुर्गातील मासे खरेदी बंद करण्याचा निर्णय घेऊन सिंधुदुर्गातील सर्व प्रकारच्या मच्छिमारांची आर्थिक नाकेबंदी करण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील मच्छिमारांना तात्पुरत्या स्वरूपाचा त्रास होणार असला तरीही या घटनेला मच्छिमार संघटनांनी संधी समजून आव्हान स्वीकारले असल्याची प्रतिक्रिया नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे सदस्य रविकिरण तोरस्कर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार व परराज्यातील पर्ससीन पद्धतीने अनधिकृत मासेमारी करणारे मासळी माफीया यांमधील संघर्ष कित्येक वर्षे सुरू आहे. राजकीय वरदहस्त, प्रशासनाची उदासीनता तसेच कालबाह्य झालेले कायदे यामुळे पारंपरिक मच्छिमारांवर उपजीविकेसाठी सातत्याने संघर्ष करण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी तळाशिल समुद्रात झालेला संघर्ष हा त्याचाच परिपाक होता.सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या मासळीला योग्य भाव मिळून बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघ आणि नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. गोवाव्यतिरिक्त इतर राज्यांमधील मत्स्य व्यावसायिकांशी व प्रक्रिया उद्योजकांबरोबर बोलणी सुरू आहे. त्यासाठी संघटनेचे पदाधिकारी मंगळवारपासून प्रत्यक्ष गाठीभेटी घेणार आहेत. यापुढे गोवा व कर्नाटकातील अनधिकृत ट्रॉलर्सची घुसखोरी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. जिल्ह्यातील मच्छिमारांनी मतभेद विसरून संघर्षास तयार रहावे. अनधिकृत मासेमारीवर लागू केलेला एमपीडीए कायदा लागू करावा यासाठी व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचेही तोरस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
सर्व मच्छिमार संघटना काम करणार
सिंधुदुर्गातील मत्स्य व्यावसायिकांची गोव्यात नाकेबंदी करण्यामुळे जो पेचप्रसंग निर्माण झाला आहे, त्याला जिल्ह्यात एकही शीतगृह व मत्स्य प्रक्रिया उद्योग नसणे या गोष्टी कारणीभूत आहेत. पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे सिंधुदुर्गातील तीनही तालुक्यांत सहकार तत्त्वावर शीतगृहांची साखळी मत्स्य प्रक्रिया उद्योग, योग्य मार्केटिंग तसेच पर्यटनाचा वापर करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक आहे. मच्छिमारांची आर्थिक नाकेबंदी होऊ न देण्यासाठी सर्व मच्छिमार संघटना काम करणार आहेत. मच्छिमारांनी धीर धरल्यास संकटावर मात केली जाऊ शकते.