दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 27, 2025 17:34 IST2025-05-27T17:33:40+5:302025-05-27T17:34:29+5:30
नागरिकांची एकी : राज्यकर्त्यांची साथ

दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती
विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आपण कुठे मागे पडलो? याबाबतची कारणीमीमांसा प्रत्येकाने केलीच पाहिजे. दुसऱ्या प्रदेशाने एखादी गोष्ट चांगली केली तर आपल्या प्रदेशात ती कशाप्रकारे राबविता येईल याबाबतचा अभ्यास सर्वांनीच करायला हवा. शाश्वत विकासाचा बारामती पॅटर्न संपूर्ण राज्यात कायमच चर्चेत असतो. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि झाराप येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ मे दरम्यान पुणे येथील बारामती तालुक्याचा अभ्यासदौरा पार पडला.
या दौऱ्यात सहभाग घेतल्याने शाश्वत विकासाची बारामती प्रत्यक्ष अनुभवता आली. रोजगारनिर्मिती, महिलांच्या हाताला काम, अत्याधुनिक शैक्षणिक हब निर्मितीतून मुलांना उच्च शिक्षणाची संधी आणि दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करत मिळविलेले यश खूपच वाखाणण्याजोगे असल्याचे निदर्शनास आले. बारामतीच्या या यशाच्या पॅटर्नमधून आपल्या प्रदेशाने, राज्यकर्त्यांनी आणि समाजसुधारकांनी प्रेरित व्हावे म्हणून जिल्हा बँकेने आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. बारामतीतील विकास प्रणालीबाबत प्रत्यक्ष घेतलेले अनुभव सांगणारी ‘लोकमत’ची वृत्त मालिका आजपासून...‘शाश्वत विकासाचा बारामती पॅटर्न..’
महेश सरनाईक
सिंधुदुर्ग : शाश्वत विकासाचा अर्थ आहे की आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण त्याचवेळी भविष्यातील पिढ्या त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील, अशी व्यवस्था राखली पाहिजे. बारामतीमध्ये शाश्वत विकासासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांमागे अनेकांचे हात अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, देशातील राजकारणात गेली ६० वर्षे आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कामाची, मेहनतीची आणि राबविलेल्या उपक्रमांची पावलोपावली प्रचिती आपल्याला पाहायला मिळेल. बारामतीमधील नागरिकांची एकी, राज्यकर्त्यांना त्यांनी दशकांदशके दिलेली साथ, यामुळे दुष्काळी भागातही भाजीपाला, शेतीत मळा फुलविल्याचा आँखो देखा हाल आपल्याला पाहता येईल.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील बहुतांश भाग दुष्काळी आहे. याठिकाणी वर्षभरात साधारणपणे सहाशे ते साडेसहाशे मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, असे असताना शरद पवार यांच्यासारख्या ध्येयवेड्या, परिपक्व राजकीय नेतृत्वाने विकासाचा बारामती पॅटर्न खूपच नियोजनबद्ध पद्धतीने राबवून येथे समृद्धी आणली आहे.
कृषी क्षेत्रातील बदल : पारंपरिक शेती पद्धती सोडून, शाश्वत शेती पद्धती स्वीकारणे, जसे की जैविक शेती, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन.
पर्यावरण संरक्षण : हवामान बदल, प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर यावर लक्ष केंद्रित करणे.
सामाजिक विकास : शिक्षण, आरोग्य आणि रोजगारा सारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे, जेणेकरून सर्वांना समान संधी मिळतील. शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञान आणि उपाय वापरणे.
स्थळानुसार बदल : बारामतीमध्ये विशिष्ट नैसर्गिक संसाधने आणि सामाजिक गरजा आहेत, त्यानुसार शाश्वत विकासाचे नियोजन केलेले आढळते. उदाहरणार्थ, बारामतीमध्ये कृषी विकास ट्रस्ट यासारख्या संस्था शाश्वत शेती पद्धती आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करत आहेत.
शाश्वत विकासाचे फायदे
पर्यावरणाची सुरक्षा : नैसर्गिक संसाधने कमी होण्याचा धोका कमी होतो आणि पर्यावरणाचे संरक्षण होते.
सामाजिक समानता : सर्वांना समान संधी मिळतात आणि गरीब व दुर्बल घटकांची आर्थिक स्थिती सुधारते.
आर्थिक विकास : शाश्वत विकासामुळे दीर्घकाळ टिकणारा आर्थिक विकास साधता येतो. शाश्वत विकास हा केवळ एक संकल्पना नाही, तर तो एक दृष्टिकोन आहे. बारामतीमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी, सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.
बारामतीमध्ये कर्तृत्वाचा मुबलक पाऊस बरसतो
१९७० पासून सुरू झालेला बारामती प्रयोग आता ५४ वर्षांचा झाला आहे. जगाची भान असणारी गावे ही भविष्यात सर्व प्रश्न सोडवतील, हा विश्वास येथे मिळतो. खूप पाऊस नाही, भाग अधिक जिरायती कमी बागायती असला तरी येथे कर्तृत्वाचा मुबलक पाऊस आहे. राजकीय इच्छाशक्ती आहे. पवार नावाची पॉवर आहे. राजकीय लोकांनी सामाजिक कार्यकर्ते यांनी हे सारे पाहिले पाहिजे. येथे दारिद्र्य आजाराचे उत्तर आहे. येथे वेगळी दृष्टी आहे. कार्यक्रम नाहीत, उपक्रम मालिका आहे. शंकराचा तिसरा डोळा दाहक असतो; पण येथील विज्ञान प्रयोग माणसाला डोळस बनवते. - डॉ. प्रसाद देवधर, अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप