सावधान.. सह्याद्रीचा बुरुज ढासळतोय; नाटळ येथील डोंगर पुन्हा कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:32 IST2025-08-04T18:31:59+5:302025-08-04T18:32:25+5:30

गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते

A portion of a mountain in the Sahyadri mountain range east of Natal village in Sindhudurg district collapsed | सावधान.. सह्याद्रीचा बुरुज ढासळतोय; नाटळ येथील डोंगर पुन्हा कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

सावधान.. सह्याद्रीचा बुरुज ढासळतोय; नाटळ येथील डोंगर पुन्हा कोसळला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ गावाच्या पूर्वेकडील दिशेला असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगराचा काही भाग गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी अचानक कोसळला आहे. यामुळे येथील नजीकच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आले. या घटनेमुळे चार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथील डोंगर कोसळण्याच्या घटनेचे स्मरण झाले आहे.

नाटळ गावाला तीनही बाजूंनी डोंगर रांगांनी संरक्षण मिळाले आहे, पण जेव्हा हे संरक्षण संकटासारखे रूप धारण करते, तेव्हा ग्रामस्थांची चिंता वाढते. गावाच्या पूर्वेस मोठा डोंगर पसरला असून, गावाच्या घाटमाथ्यापासून कोल्हापूर जिल्ह्याची सीमा सुरू होते. या घाटमाथ्याजवळून कोल्हापूरमधील काळम्मा धरणाचे पाणी येथील डोंगर भागात मुरत आहे. अनेक वर्षांपासून उन्हाळ्यातही येथे पाण्याचे अस्तित्व राहिल्याने, डोंगरांच्या माती भाजणीचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस पाणी साचण्याची क्षमता वाढत असल्यामुळे या भागात भूस्खलनाचा धोका अधिक आहे. यावर शासनस्तरावर तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात माळीणसारखे प्रसंग घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या वर्षी पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. १२ मे पासून दमदार पाऊस होत असून, डोंगर भागात ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे. त्याच्या परिणामस्वरूप, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्या डोंगराचा एक भाग कोसळला. जो फळसाच्या माळला लागून आहे. रात्रीच्या वेळी डोंगराचा भाग कोसळल्यामुळे कानठळी बसणारा आवाज झाला, असे रात्री जागे असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले.

शासनाकडून उपाययोजना आवश्यक

डोंगराचा कोसळलेला भाग खाली राहत असलेल्या नामदेव सावंत व त्यांच्या भावांच्या घरांपासून खूप जवळ आहे. कोसळलेली माती आणि दगड थेट नदीपात्रात पडले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अंदाजे २५-३० मीटर रुंद आणि २५०-३०० मीटर उंचीचा भाग डोंगर कोसळला आहे. काही वर्षांपासून या भागात अनेक छोटे छोटे भूस्खलन होत आहेत. निसर्गाने येथे त्याचा रौद्र रूप दाखवला असून, भविष्यात अशा नैसर्गिक संकटांपासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी शासनात उपाययोजना आवश्यक आहेत.

शासनाचे सर्वेक्षण अहवाल प्राप्त नाहीत

चार वर्षांपूर्वी दिगवळे रांजणवाडी येथे डोंगर कोसळल्याने एक घर जमिनीखाली गाडले गेले व एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी झाला होता. या घटनेनंतर शासनाने सह्याद्री पट्ट्यातील कुंभवडे, नाटळ, दिगवळे, नरडवे, सोनवडे या गावांमधील डोंगर भागांचे सर्वेक्षण केले होते. ग्रामस्थांना त्यांच्या घरांचा विमा त्वरित काढण्याबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या, मात्र त्यात जीविताच्या सुरक्षेचा उल्लेख नव्हता. शासनाचे सर्वेक्षण अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही, अशी चौकशीत माहिती मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री या बाबतीत अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन ग्रामस्थांना दिलासा देतील, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

काळम्मा धरणाचे पाणी येथे अनेक वर्षांपासून मुरत असल्याने माती सैल झाली असून, डोंगर कोसळण्याचा धोका वाढला आहे. आम्ही जंगल भागांत फेरफटका मारला असून, अनेक ठिकाणी भूस्खलनाची चिन्हे दिसून आली आहेत. ही परिस्थिती भविष्यात अतिशय धोकादायक ठरू शकते. - गोपाळ सावंत, निसर्गप्रेमी

Web Title: A portion of a mountain in the Sahyadri mountain range east of Natal village in Sindhudurg district collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.