सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्ग नव्या सर्व्हेप्रमाणे तो थेट रेडी बंदराला जोडला जावा, यासाठीची मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून त्यांनी त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते सावंतवाडीत बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, अशोक दळवी आदी उपस्थित होते.केसरकर म्हणाले की, कोकणात पुढील काळात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काही परदेशी कंपन्यांबरोबरही बोलणी सुरू आहेत. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांचे या जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत आणि आमदार नीलेश राणे यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कोकणावर विशेष प्रेम असल्याने भविष्यकाळात कोकण एका वेगळ्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एका समर्पित जीवनाचा अंतमहाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र विकासभाई सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शिखर बँकेचे उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी फार मोठे कार्य केले होते. विशेषतः भाईसाहेबांचा शिक्षणाचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शाळा हाच त्यांचा ध्यास होता. त्यामुळे विकासभाईंच्या निधनाने ‘एका समर्पित जीवनाचा’ अंत झाल्याची भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्दमतदारसंघातील जनतेचे माझ्यावर निश्चितच भरपूर प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच तब्बल चारवेळा त्यांनी मला आतापर्यंत आमदार म्हणून निवडून दिले आहे. या दुःखदप्रसंगी मी त्यांच्या सदिच्छांचा स्वीकार करू शकत नाही, असे स्पष्ट करीत केसरकर यांनी येत्या १८ जुलै रोजी होत असलेल्या आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले.