Sindhudurg: भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चौघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:23 IST2025-07-07T13:22:20+5:302025-07-07T13:23:32+5:30

बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

A leopard in search of prey fatally attacks four people, rescue team arrives to catch the leopard | Sindhudurg: भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चौघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

Sindhudurg: भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचा चौघांवर जीवघेणा हल्ला, बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथे भक्ष्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने चौघांवर जीवघेणा हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. प्रभाकर मुळीक, सूर्यकांत सावंत, पंढरी आजगावकर, आनंद न्हावी अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर मळेवाड प्राथमिक केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर उपवनसंरक्षक, वनविभाग कर्मचारी, पोलिस घटनास्थळावर दाखल झाले असून, बिबट्याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

मळेवाड-कोंडुरे परिसरात बिबट्याचा वावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून बिबट्या दृष्टीस पडतो. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान प्रभाकर मुळीक यांच्या घरामागे कुत्रा व मांजराला आपले भक्ष्य करण्यासाठी बिबट्या आला होता. त्याच्या हालचालींची चाहूल लागल्याने मुळीक यांनी घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा उघडला असता त्यांच्यासमोरच बिबट्या आला. त्याने काही समजण्याच्या आत मुळीक यांच्यावर हल्ला चढवला. तसेच पंजाचा मारा केला. यात त्यांच्या डोक्याला तसेच हाताला गंभीर दुखापत झाली. मुळीक यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पलायन केले. यानंतर जखमी मुळीक यांना उपचारासाठी मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

ही घटना ताजी असतानाच मळेवाड-देऊळवाडी येथील सूर्यकांत सावंत यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी त्यांना बिबट्याच्या तावडीतून सोडविले. सावंत यांना सोडवताना ग्रामस्थांमधील पंढरी आजगावकर, आनंद न्हावी यांना बिबट्याने जखमी केले आहे. या सर्वांना मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीम

दिवसाढवळ्या भरवस्तीत येऊन बिबट्याने हल्ला केल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुळीक यांच्या घरामागील बागेत चारही बाजूला पावसाचे पाणी साचले असल्याने बिबट्यास पाण्यातून बागेबाहेर जाणे कठीण आहे. त्यामुळे तो बागेतच असावा, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची रेस्क्यू टीम गावात दाखल झाली आहे.

Web Title: A leopard in search of prey fatally attacks four people, rescue team arrives to catch the leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.