Sindhudurg: हुंबरट तिठा येथे गोवा बनावटीच्या दारूसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकाला कोठडी 

By सुधीर राणे | Published: March 25, 2024 01:09 PM2024-03-25T13:09:17+5:302024-03-25T13:09:35+5:30

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई

38 lakh worth of Goa-made liquor seized from Humbart Thitha in Sindhudurg | Sindhudurg: हुंबरट तिठा येथे गोवा बनावटीच्या दारूसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकाला कोठडी 

Sindhudurg: हुंबरट तिठा येथे गोवा बनावटीच्या दारूसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त, चालकाला कोठडी 

कणकवली: गोवा बनावटीच्या दारूची टँकरमधून छुप्या पद्धतीने सुरु असलेली वाहतूक राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रोखली. महामार्गावरील हुंबरट तिठा येथे  करण्यात आलेल्या या कारवाईत २४ लाख ९० हजारांची दारू, १३ लाखांचा टँकर व अन्य मिळून ३७ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेला टँकर चालक प्रभूलाल भंवरलाल (वय-३४, दंतेडी-धुवाला, ता. मांडल, जि. मीलवाडा, राजस्थान) याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क, कणकवली विभाग यांच्यातर्फे महामार्गावरील वाहनांची तपासणी सुरु आहे. या मार्गाने टँकरमधून चोरटी दारू वाहतूक सुरु असल्याची माहिती त्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने हुंबरट तिठा येथे सापळा रचून मुंबईच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक (जी.जे. १२ ए.वाय. २३६) थांबविला. टेम्पोचा हौदा उघडला असता आतमध्ये एक कंपार्टमेंट आढळले. पाहणीत हौद्यामध्ये चार कंपार्टमेंट असल्याचे आढळले. यात गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. 

टँकर व दारू जप्त करून वागदे येथील राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात आणण्यात आली. कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन. एल. शिंदे, दुय्यम निरीक्षक एस. डी. पाटील, जे. एस. मानेमोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. चौधरी, महिला जवान स्नेहल कुवेसकर, खान, शहा आदी सहभागी झाले होते.

Web Title: 38 lakh worth of Goa-made liquor seized from Humbart Thitha in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.