मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:48 PM2024-05-08T18:48:39+5:302024-05-08T20:26:48+5:30

पित्रोदा यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा हे त्यांच्या एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या विधानाचा दाखला देत सत्ताधारी भाजपसह विविध क्षेत्रातील नामांकित मंडळी त्यांना लक्ष्य करत आहे.

सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा कराविषयी धक्कादायक विधान केले. त्यांच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले होते. मात्र आता पुन्हा एकदा पित्रोदा यांनी माध्यमांशी बोलताना भारतीयांच्या दिसण्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली.

भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांच्या अशा टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दुसरीकडे पक्षाने त्यांच्या या विधानाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

पित्रोदा म्हणाले की, आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो.

तसेच पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भाऊ-बहिण आहेत, असेही पित्रोदा यांनी सांगितले.

पित्रोदा यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. अशातच साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली. तिचा देखील रोख पित्रोदा यांच्याकडे असल्याचे दिसते.

तिने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, मी दक्षिण भारतातील असली तरी भारतीय दिसते. प्रणिता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती विविध मुद्द्यांवर भाष्य करत असते.