देवरुख : गव्याने एसटी बसला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्या. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. ही घटना काल, गुरुवारी सकाळच्या सुमारास देवरुखनजीकच्या कुळेवाशी येथे घडली. दरम्यान दशक्रोशीत गव्याचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.चालक एस. एस. पडघान सकाळी पावणेआठ वाजता सुटणारी फणसवळे ते संगमेश्वर बस (एमएच १४ बीटी १४४३) घेऊन निघाले. फणसवळे येथून प्रवासी घेऊन संगमेश्वरच्या दिशेने येत असताना कुळे शाळा स्टॉपजवळ बस थांबली. त्याचवेळी जवळच्या नदीतून पाणी पिऊन आलेल्या गवा रेड्याने अचानक बसला धडक दिली. या धडकेमुळे बस पुढे जाऊ लागली. त्यामुळे चालकाने ब्रेक दाबला.त्यावेळी कुळे शाळा स्टॉपवर दोन विद्यार्थिनी गाडीतून खाली उतरत होत्या, त्या पायरीवयन पडल्या. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गाडीतील प्रवाशांनी याबाबतची माहिती मुलींच्या नातेवाइकांना दिल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेले.गावात गव्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गवा रेड्याने गावान पिकाचेही बरेच नुकसान केले आहे. वन विभागाने याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Sindhudurg: गव्याची एसटीला धडक, २ विद्यार्थिनी जखमी; देवरुखनजीकची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:54 IST