जिल्हा परिषदेची सभा अधिकाऱ्यांवर गाजणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:58+5:302021-06-16T04:50:58+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषदेची मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा काही अधिकाऱ्यांवर गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर रजेवर गेलेल्या ...

जिल्हा परिषदेची सभा अधिकाऱ्यांवर गाजणार!
सातारा : सातारा जिल्हा परिषदेची मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा काही अधिकाऱ्यांवर गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर रजेवर गेलेल्या एका अधिकाऱ्याला पुन्हा हजर करुन घेऊ नये, असा ठरावही होण्याची शक्यता आहे. तर बोगस अभियंत्यांचा मुद्दाही पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे अधिकारी कोंडीत सापडू शकतात.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. १५ रोजी दुपारी एक वाजता दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सुरू होणार आहे. सर्वसाधारण सभेचा वर्षभरातील इतिहास पाहता अधिकाऱ्यांवरच गाजली आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक सर्वांनीच अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. या वेळीही अशीच स्थिती निर्माण होऊ शकते.
आताच्या सर्वसाधारण सभेत कोरोना आणि लसीकरण हे मुद्दे असणार आहेत. त्याचबरोबर काही अधिकारी सदस्यांच्या रडारवर राहतील. यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत सदस्य तसेच पदाधिकारीही नाराज आहेत. त्यामुळे या सभेत हा विषय येऊन त्यांच्या विरोधात ठराव होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा चांगलीच गाजू शकते.
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत काही अभियंत्यांनी बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याची तक्रार साताऱ्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. याबाबत विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतही काही सदस्य सभेत चौकशी कुठपर्यंत आली यावरून प्रशासनाला विचारणा करण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सभा अधिक गाजणार आणि रंगणार असल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.