वाई (जि. सातारा) : सोनगीरवाडी, वाई येथे चेष्टामस्करीच्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरच्या दोन बाटल्या फोडल्या. तसेच अमानुषपणे मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. राज अरुणकुमार सिंग (वय २६, रा. वाई, मूळ रा. जसवली, ता. महानंदपूर, जि. नवादा, बिहार), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी प्रणीत दीपक गायकवाड (वय २५), शाकीर शहाबुद्दीन खान (दोघे रा. आंबेडकरनगर, सोनगीरवाडी, वाई) यांना पोलिसांनी अटक केली आहे.राज सिंग आणि त्याचे मित्र प्रणीत दीपक गायकवाड व शाकीर शहाबुद्दीन खान (दोघे रा. आंबेडकरनगर, सोनगीरवाडी, वाई), विनोद साळुंखे व हर्षवर्धन कारेकर हे सोनगीरवाडी, वाई येथे मंगळवारी रात्री बाभळवनात दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, शाकीर याने हर्षवर्धन याच्या कानशिलात मारल्याने तो तिथून निघून गेला. त्यानंतर राज, प्रणीत व शाकीर यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला गेल्याने प्रणीत याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बाटल्या फोडल्या. शाकीर व प्रणीत यांनी मिळून बांबूने राज याला मारहाण केली.विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणीत व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. बुधवारी पहाटे तीन वाजता हा खुनाचा प्रकार उघडकीस आला.
Satara Crime: चेष्टामस्करी जिवावर बेतली, डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून अमानुषपणे मारहाण करत तरुणाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:45 IST