प्रेमास नकार दिल्याने तोंडावर अॅसिड टाकण्याची युवतीला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:14 IST2020-09-29T13:10:04+5:302020-09-29T13:14:10+5:30
प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेमास नकार दिल्याने तोंडावर अॅसिड टाकण्याची युवतीला धमकी
सातारा : प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
विक्रम बाळकृष्ण निपाणे (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित २७ वर्षीय युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
गत दहा वर्षांपासून विक्रम निपाणे हा संबंधित युवतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, अशी तो युवतीला गळ घालत होता.
मात्र संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या निपाणे याने तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर अॅसिड टाकतो व बघतो, तुझ्याबरोबर कोण लग्न करतो ते, अशी त्याने संबंधित युवतीला धमकी दिली.
या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयित विक्रम निपाणे याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.