कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:02 IST2021-04-23T17:57:18+5:302021-04-23T18:02:50+5:30
CoronaVirus Karad Satara : गेले वर्षभर लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती अधिकाधिक वाढत आहे. सध्या राज्यभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्याने कोरोना झाल्याच्या भीतीने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या
वडगाव हवेली/कऱ्हाड : गेले वर्षभर लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती अधिकाधिक वाढत आहे. सध्या राज्यभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्याने कोरोना झाल्याच्या भीतीने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील अनिल उत्तम चलवादे (वय ४५ ) हे काही वर्षांपासून वडगाव हवेली येथील स्टॅन्ड परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. याच परिसरात ते बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. काही दिवसांपासून किरकोळ स्वरूपात आजारी असल्याने यांनी कोविड १९ बाबत असणारी टेस्ट काल दि. २२ रोजी वडगाव हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेतली होती. मात्र रिपोर्ट आला नव्हता.
टेस्ट घेतल्यापासून ते, आपणास कोरोना झाला असेल या भीतीपोटी अस्वस्थ होते. यातूनच त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे रात्रभर ते विचारात असल्याची जाणीव घरातील सदस्यांना झाली होती. मात्र सकाळी सात वाजता घरातील लोक आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतानाच, त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेऊन पंचनामा करण्यात आला. घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.