वाई तालुक्यात युवकांचा राडा
By Admin | Updated: August 9, 2015 00:48 IST2015-08-09T00:27:19+5:302015-08-09T00:48:30+5:30
लोहारे येथे हाणामारी : सात जण जखमी; दुचाकी जाळली, दहा जणांना कोठडी

वाई तालुक्यात युवकांचा राडा
वाई : एसटीत बसण्याच्या कारणावरून बोपर्डी व लोहारे गावांतील महाविद्यालयीन युवकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये सातजण जखमी झाले असून, याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी एका दुचाकीची मोडतोड करून जाळण्यात आली. तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता लोहारे येथे घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
वाई पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दोन महिन्यांपासून लोहारे व बोपर्डी गावांतील कॉलेजच्या युवकांमध्ये एसटीत बसण्यावरून अनेक छोटे-मोठे वाद सुरू होते. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास कॉलेजच्या रस्त्यावर दोन्ही गावांतील मुलांच्या गटांत बाचाबाची होऊन भांडण झाले होते़ याचा जाब विचारण्यासाठी बोपर्डीतील चार युवक लोहारे येथे गेले़ त्यावेळी तेथे असलेल्या युवकांबरोबर त्यांची मारामारी झाली.
बोपर्डीतील युवकांनी फोनवर गावात या प्रकाराची माहिती दिल्यानंतर गावातील शंभर ते दीडशे युवक काठ्या घेऊन लोहारेमध्ये पोहोचले. दोन्ही गट एकमेंकांना भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये महाविद्यालयीन युवकांसह ग्रामस्थही जखमी झाले. भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलांनाही मारहाण झाली. तसेच बोपर्डीतील चार व लोहारे येथील तीनजण गंभीररीत्या जखमी झाले़ जखमींना वाई व सातारा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतप्त झालेल्या युवकांना घटनास्थळी असलेली एका दुचाकीची तोडफोड करून ती पेटवून दिली.
लोहारे गावामध्ये युवकांची मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पाचगणी, महाबळेश्वर, मेढा, भुर्इंज येथून जादा कुमक मागविली होती. गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला जमाव पांगवला. मात्र, काही युवकांनी अंधारात लपून पोलिसांवरच दगडफेक केल्याने वातावरण आणखीनच चिघळले. त्यानंतर पोलिसांनी धरपकड करून काही जणांना ताब्यात घेतले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (प्रतिनिधी)