सातारा : वाढती लोकसंख्या ही विकासात बाधक ठरत असते. शासनातर्फे लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. याचा चांगला परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. दोन-तीन दशकांपूर्वी कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केली जात होती. काही वर्षांपासून नवीन जोडपे शस्त्रक्रिया करण्याऐवजी कुटुंबनियोजन साधनांचा वापर करत आहेत. त्यांच्या मनाच्या ब्रेकमुळे लोकसंख्या वाढीला आळा बसत आहे.सातारा जिल्ह्यातील जनता ही कायम चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत असते. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनांना त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. याचाच अनुभव लोकसंख्येच्या बाबतीतही अनुभवास मिळत आहे. आणीबाणीच्या काळात तर पुरुषांची धरपकड करुन कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली जात होती. त्याचा फटका इंदिरा गांधी सरकारला बसला होता.साधारणत: ऐंशीच्या दशकात ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ अशी जनजागृती करुन किमान तीन अपत्यानंतर थांबण्याचा सल्ला दिला जात होता. त्यानंतर ‘हम दो, हमारे दो’ची घोषणा देण्यात आली. यामध्ये दोन मुले, उज्ज्वल भविष्य, जास्त मुले कुठे भविष्य? असा प्रश्नही विचारला जात होता. पण आता कोठेही जाहिरातीची गरज भासत नाही. नवीन पिढीच चांगले-वाईट जाणत असल्याने त्यांनी कुटुंब नियोजनावर भर दिला आहे.
आरोग्य यंत्रणेला ना सक्ती उद्दिष्टाची
लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून लोकसंख्येचा विचार करुन कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट दिले जात होते. त्याप्रमाणे ते गाव, खेडी, वस्तीवर जाऊन जोडप्यांना प्रवृत्त करत असत. उद्दिष्ट साध्य न झाल्यास वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागत. पण आता उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तरीही फारसा फरक पडत नसल्याचे लक्षात आले आहे.ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारीच प्रचारकशहरी भागात औषधांच्या दुकानांमध्ये निरोध सहज मिळतात. पण ग्रामीण भागात ही साधनं सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे नवदाम्पत्यांपर्यंत ही साधनं पोहोचविण्याची जबाबदारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक यांच्यावर येऊन पडत असते. ते ही साधनं वापरण्याबाबत जागृती करत असतात.
कुुटुंब नियोजनाच्या उपलब्ध पद्धतींबद्दल जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. यासाठी कुटुंबनियोजन सेवांबाबत जिल्हास्तरावरून कॅलेंडर तयार करुन त्यांचे वाटप केले जाते. - डाॅ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा.