राज्यपाल निवासस्थानासाठी ४८ एकर जागा कशाला? - उदयनराजे भोसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 11:44 IST2025-04-15T11:44:07+5:302025-04-15T11:44:52+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी ४० एकर जागा मिळावी

राज्यपाल निवासस्थानासाठी ४८ एकर जागा कशाला? - उदयनराजे भोसले
सातारा : राज्यपालांच्या निवासस्थानासाठी ४८ एकर जागा ठेवली आहे. एवढी कशाला पाहिजे ?. यापेक्षा आठ एकर जागा निवासस्थानासाठी ठेवावी. उर्वरित ४० एकर जागा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी द्यावी, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. तसेच याबाबतची मागणी राज्य आणि केंद्र शासनाकडेही केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, अण्णा वायदंडे, अप्पा तुपे आदी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही. मुंबईतील राजभवनची ४८ एकर जागा आहे. यामधील ४० एकर जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी मिळावी. तेथे शासनाने शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे असे स्मारक उभे केले पाहिजे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांचा अवमान होऊ नये यासाठीचा कायदा काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेही केला नाही. शिवसेनेच्या नावातच शिवाजी महाराजांचे शिव आहे; पण त्यांनीही काही केले नाही. आता कायदा होत आहे. हे माझ्याकडून होत असल्याने आयुष्यातील मोठे काम ठरणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यात राहत होते. ते घर लवकरच शासनाच्या ताब्यात घेऊन डाॅ. आंबेडकर यांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्नशील राहणार आहे. तसेच साताऱ्यातील राजवाड्याबाबतही हेरिटेज ऑर्किऑलॉजिकल विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. कारण, अशा वास्तू पुन्हा बांधून होणार नाहीत. त्यामुळे शासनानेही गांभीर्याने पावले उचलावीत, असेही खासदार उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
खास रंगाची खास बात..
उदयनराजे भोसले यांनी निळा शर्ट परिधान केला होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. ते सर्वांनाच आवडत असलेतरी त्यापैकी निळा रंग हा मला नेहमीच आवडतो. खास रंगाची खास बात आहे. मानवजातीत जात-पात करणाऱ्यांना मनुष्यधर्म कसा लक्षात येईल? एखाद्यास अपघातानंतर रक्ताची गरज पडली तर जात पाहून घेतो का ? जातिवाद थांबला नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराणी ताराराणी यांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी बैठक
सातारा शहराजवळील संगम माहुलीतील महाराणी ताराराणी यांच्या समाधीबद्दलही उदयनराजे यांनी माहिती दिली. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीच्या माध्यमातून समाधीच्या कामासाठी जो निधी लागेल, तो केंद्रातून आणू, असे त्यांनी सांगितले.