शिरवळहून साताऱ्यात येत असताना वर्येजवळ दुचाकीवरील युवक एसटीच्या धडकेत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 14:57 IST2017-11-30T14:53:02+5:302017-11-30T14:57:13+5:30

शिरवळहून साताऱ्यात येत असताना वर्येजवळ दुचाकीवरील युवक एसटीच्या धडकेत ठार
सातारा : शिरवळहून साताऱ्यात दुचाकीवरून येत असताना एसटीने दिलेल्या धडकेत निशाद रवींद्र खुडे (वय २८, रा. खंडोबाचा माळ, रविवार पेठ, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास वर्ये, ता. सातारा येथे झाला.
निशाद खुडे हा शिरवळ येथे काही कामानिमित्त दुचाकीवरून गेला होता. सायंकाळी तो परत साताऱ्याकडे येत होता. याचवेळी साताऱ्याकडून आलेल्या एसटीने त्याला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, काही अंतर उडून तो फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून तत्काळ रक्तस्त्राव सुरू झाला. दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. बराचवेळ तो विव्हळत रस्त्यावर पडला होता. काहीवेळानंतर रुग्णवाहिका त्या ठिकाणी आली.
रुग्णवाहिकेने त्याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, बुधवारी दुपारी निशादचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघातानंतर वर्ये येथे नागरिकांनी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद अद्याप शहर पोलिस ठाण्यात झाली नव्हती.