एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:28 IST2017-12-06T16:24:26+5:302017-12-06T16:28:14+5:30
एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली.

एसटी प्रवासी आक्रमक होताच दमबाजी करणाऱ्या कार चालकाची धूम, काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत घटना
सातारा : एसटी बसला कार आडवी लावून दमदाटी करीत शिव्या देणाऱ्या कार चालकाला प्रवाशांच्या आक्रमकतेमुळे धूम ठोकून पळून जावे लागले. पुणे-बेंगलोर महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत ही घटना घडली.
मिरज-नाशिक ही हिरकणी बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. महामार्गावर वाहनांची गर्दी होती. त्यातच कारचालक चुकीच्या पद्धतीने हेलकावे खात गाडी चालवत होता. एसटी बस ओलांडून पुढे आल्यावर या कार चालकाने एसटीचा पाठलाग केला.
कार एसटीला आडवी मारत बस थांबविण्यासाठी भाग पाडले. चालकाने रस्त्याच्या कडेला बस थांबवली. तोच कारचालक गाडीतून खाली उतरला आणि त्याने चालक-वाहकाला दमदाटी करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार प्रवासी काही काळ शांतपणे ऐकत होते. परंतु अतिच होऊ लागल्यावर प्रवासी भडकले. दमदाटी करणाऱ्या कारचालकाला त्यांनी चांगलाच दम भरला. काहींनी मोबाईल काढून कारचा फोटो देखील काढला.
हा प्रकार आपल्या अंगलट येणार, हे लक्षात आल्यावर कारचालक पुरता विरघळला. जणू त्याचा अचानकपणे आवाज बसला. गाडी सुरू करून तो निमूटपणे निघून गेला. चालक आणि वाहक यांनी प्रवाशांचे आभार मानले.
दरम्यान, सेवा बजावत असताना किरकोळ चूकही आम्हाला महाग पडते. या घटनेच्यावेळी आमची चूक नव्हती, तरीदेखील अधिकाऱ्यांनी आमची बाजू घेतली नसती. उलट आमच्यावरच चूक केल्याचा धब्बा ठेवला असता, अशी व्यथा या कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडली.