अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरींना भरपाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:03+5:302021-08-29T04:37:03+5:30
कऱ्हाड : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कऱ्हाड दक्षिण विभागातील १०० हून अधिक विहिरींची मोठी पडझड झाली आहे. विहिरी ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विहिरींना भरपाई कधी?
कऱ्हाड : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कऱ्हाड दक्षिण विभागातील १०० हून अधिक विहिरींची मोठी पडझड झाली आहे. विहिरी गाळाने पूर्ण भरल्या असून, वीजपंप व पाणी उपसण्यासाठी लावलेल्या पाईप काही ठिकाणी वाहून गेल्या आहेत. अशा अवस्थेत असलेल्या विहिरींच्या डागडुजी तातडीने होणे गरजेचे आहे तरच शेतीला पाणी मिळू शकेल, यासाठी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
मागील महिन्यात दक्षिण मांड नदीला आलेल्या महापुरामुळे व परिसरात ढगफुटी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नदीकाठच्या तसेच शेतशिवारातील अनेक विहिरींना याचा फटका बसला आहे. अनेकांच्या बंदिस्त असलेल्या विहिरी पडून गाळाने भरल्या आहेत; तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी पूर्ण काठोकाठ मुरूम व गाळाच्या मातीने मुजवून गेल्या आहेत. विहिरीवरील पाणी उपसण्यासाठी जोडलेले वीजपंप पाण्याने वाहून गेले आहेत, तर पाणी उपसण्यासाठी लावलेल्या पाईप तुटून पडल्या असून, काही वाहून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
दक्षिण मांड नदीला जोडणाऱ्या गोटेवाडी, येळगाव, येणपे, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येवती, शेळकेवाडी, उंडाळे, महारुगडेवाडी, जिंती, साळशिरंबे, मनव, नांदगाव, काले पायणी, पाटील मळा, काले, जुजारवाडी, वाठार, चपणेमळी, धोंडेवाडी, महादेव मंदिर परिसर, भैरवनाथ नगर, आदी परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या विहिरी जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सरासरी लाखोंचे नुकसान झाले आहे. विहिरींची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
पावसाने विश्रांती घेऊन महिना उलटला आहे. प्रत्येक गावातील विहीर तसेच शेतीचे नुकसानीचे पंचनामे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, जलसंधारण विभाग यांच्यामार्फत झाले आहेत; तर काही ठिकाणी कोणताच अधिकारी शेतकऱ्यांचे नुकसान पाहावयास आलेला नाही. असेही अनेक गावांत झाले आहे. शासकीय करपात्र विहिरींना शासन पातळीवर भरपाई दिली जाते. मात्र खासगी नुकसान झालेल्या विहिरींनी अपवादात्मक भरपाई मिळते. नुकसानीचा डाटा शासनाकडे सादर केला आहे. मात्र, नुकसानभरपाईचा कोणताच आदेश शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान मिळेल की नाही, हे रामभरोसे आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटातून शेतकरी कसेबसे सावरत आहेत, तोच अतिवृष्टीमुळे पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत देऊ करावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी करत आहेत.
(चौकट)
पाईपलाईनचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर...
अतिवृष्टीमुळे विहिरीचे झालेले नुकसानीचे पंचनामे शासकीय अधिकाऱ्यांनी केले आहेत. त्यातून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. नव्याने विहीर खुदाई करताना प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी पाच लाखांहून अधिक खर्च येत असतो. मात्र, अनेकांच्या विहिरी पूर्ण काठोकाठ मुजल्या आहेत. त्यातील गाळ काढणे अशक्य आहे. वीजपंप व पाईपलाईन याचाही खर्च शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर आहे. शासकीय तुटपुंजी मदत शेतकऱ्याला पुन्हा उभारी देणारी ठरावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
फोटो
पाटीलमळा (ता. कऱ्हाड) येथे अतिवृष्टीमुळे येथील शेतकऱ्यांची विहीर गाळाने भरून नुकसान झाले आहे.