इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 23:04 IST2025-06-23T23:03:56+5:302025-06-23T23:04:22+5:30
इराणने कतारमधील अमेरिकेच्या ठिकाणांच्या दिशेने ६ क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त आहे. कतारची राजधानी दोहा या मोठ-मोठ्या स्फोटांनी दणाणून गेली...

इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केल्यानंतर, आता इराणनेही इस्लामिक देश कतारवर हल्ला करत, अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. कारण, येथेच अमेरिकन लष्कराचा सर्वात मोठा एअरबेस आहे. यासंदर्भात, इराणने सोमवारी रात्री घोषणा करत, "आपण कतारमधील अल उदेद हवाई दलाच्या तळावर तैनात अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्याचे म्हटले आहे." ही घोषणा इराणी राज्य टेलिव्हिजनवर सैन्य संगीतासह करण्यात आली. यावेळी, स्क्रीनवरील कॅप्शनमध्ये, ही 'अमेरिकेच्या आक्रमकतेविरुद्ध इराणी सशस्त्र दलांची शक्तिशाली आणि यशस्वी प्रतिक्रिया' असल्याचे म्हणण्यात आले आहे.
इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली -
AXIOS ने एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ६ क्षेपणास्त्रे डागली आहेत." कतारची राजधानी दोहा या मोठ-मोठ्या स्फोटांनी दणाणून गेली होती. तत्पूर्वी, रविवारी पहाटेच्या सुमारास अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य केले होते.
कतारने सोमवारी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते -
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी, अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, तेहरानने बदला घेण्याची धमकी दिली होती. इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिल्यानंतर, कतारने सोमवारी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. कतारमध्ये अल उदीद एअर बेस आहे, जे अमेरिकन लष्कराचा एक महत्वाचे ठिकाण आहे. कतारने हा निर्णय तात्पुरता असल्याचे म्हटले होते.