अर्धांगिनी जेव्हा उचलते शिवधनुष्य...
By Admin | Updated: March 8, 2016 00:55 IST2016-03-07T22:09:08+5:302016-03-08T00:55:25+5:30
कर्त्याच्या हतबलतेमुळं परिस्थितीपुढे हात न टेकता वीरांगना उतरल्या रणक्षेत्रात,,कोमात गेलेल्या पतीची सात वर्षे सेवा---मोलमजुरी करून लावले मुलीचे लग्न

अर्धांगिनी जेव्हा उचलते शिवधनुष्य...
प्रत्येक दिवस लढाईचा : कर्त्याच्या हतबलतेमुळं परिस्थितीपुढे हात न टेकता वीरांगना उतरल्या रणक्षेत्रात
पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाकं असतात. एक रुतलं तर दुसऱ्यानं साथ द्यायची असते. त्याचप्रमाणे आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतल्यावर पती संकटात असेल तर त्याला ती बाहेर नाही काढणार तर कोण. अशा कणखर, जिद्दी महिलांना ‘लोकमत’चा सलाम.
विशाल सूर्यवंशी -- बुधपतीला अपंगत्व आले असतानाही खचून न जाता ती अपंग पतीचा आधार बनली. ही कथा आहे बुध येथील सिंधू सोमनाथ कुंभार यांच्या कर्तृत्वाची.सज्जनगडाच्या पायथ्याला असलेले पळशी हे सिंधुतार्इंचे माहेऱ. मुलाशी आपले लग्न ठरले त्या सोमनाथरावांचा ट्रक अपघात झाला. यामध्ये सोमनाथांना डावा पाय गुडघ्यापासून कायमचा गमवावा लागल्याची बातमी सिंधुताई यांना कळाली; पण याही परिस्थितीत याच मुलाबरोबर लग्न करण्याचा धाडसी निर्णय सिंधुतार्इंनी घेतला़
मोठ्या मनाने आल्या संकटाचा स्वीकार करून बुध या छोट्याशा गावात सिंधुताई लग्न करून आल्या़ घरची परिस्थिती बेताची. डोक्यावर साध्या छप्पराचे घर व घरात पारंपरिक कुंभार व्यवसाय. त्यामुळे आलेला दिवस ढकलायचा असा रोजचा बेत; पण ध्येयवादी सिंधुतार्इंनी परिस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला़ मुलांना चांगले शिक्षण, टुमदार घर, घरात साऱ्या सुखसोयी असाव्यात हे स्वप्न पाहिलेल्या सिंधुतार्इंनी हलाख्याची परिस्थिती बदलण्याचा चंग बांधला. पत्नीच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम तिच्या पाठीशी ठाम राहण्याचे काम सोमनाथ यांनी केले.पारंपरिक कुंभार व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा चंग त्यांनी बांधला. त्यामुळे कामाचा मोठा ताण वाढला; पण सोमनाथरावांनी अपंगत्त्वाकडे दुर्लक्ष करून एका पायावरच मडकी, डेरे घडविण्यासाठी चाक फिरवूलागले. चाकाच्या गतीबरोबर चाकावरील माती आकार घेऊ लागली. दोन-चार महिने चालणाऱ्या या व्यवसायाने सिंधुतार्इंच्या संसाराला हातभार लावला़
सुनीता नलावडे == लोहम सैन्यात शिपाई असलेले धोंडिराम सखाराम सावंत यांच्याशी नलिनी यांनी ६ मार्च १९८६ रोजी लग्न केले. नवरा सैन्यात असल्यानं अनेक स्वप्न पाहिलेल्या स्वप्नांचा एका अपघातानं चुराडा केला. पती रजेवर गावी आलेले असताना शिरवळ येथे ५ जानेवारी १९८७ रोजी अपघात झाला. अपघातानंतर ते सहा महिन्यांत कोमात होते. कोमातून बाहेर आले; पण दोन वर्षे बोलता येत नव्हते. पण कमरेखालचा भाग निष्क्रिय झाल्याने ते अंथरूणालाच खिळून आहेत. नलिनी या पतसंस्थेत काम करुन संसार करत आहेत.
कोमात गेलेल्या पतीची सात वर्षे सेवा
झुंज एकाकी : पळशी येथील वर्षा खाडे यांचा गावाला अभिमान
शेखर जाधव - वडूज वर्षा खाडे यांचे माहेर आणि सासर हे माण तालुक्यातील पळशी. खेळायच्या वयात दहावी झाल्यानंतर त्यांचं डॉ. अर्जुन खाडे यांच्याशी लग्न झाले. पती डॉ. अर्जुन खाडे यांच्या प्रोत्साहनाने जिद्दीने बारावीत चांगले गुण प्राप्त करून त्याही डॉक्टर झाल्या. संसार ही फुलू लागला. दोन मुली झाल्या असतानाच नियतीनं घाला घातला. एका अपघातात पती डॉ. अर्जुन खाडे गंभीर जखमी झाल्याने कोमात गेले. तब्बल सात वर्षे घरातच अतिदक्षता विभागासारखी व्यवस्था करून त्यांनी पतीची सेवा केली. दरम्यान, त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सिव्हिल सर्जन केडर वर्ग एकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या व्यवसायाने शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक आहेत. भयंकर परिस्थितीतूनही दोन मुलींना जगण्याचे बळ देणाऱ्या डॉ. वर्षा खाडे यांचा हा असमान्य संघर्ष पाहून अनेकजण जगणं शिकले. त्यांचा हा सोळाव्या वर्षी सुरू झाला. वयाच्या ३७ व्या वर्षी एका वळणावर जन्मांतरीची साथ देणारा पती कायमचा सोडून गेला. डॉ. अर्जुन खाडे यांचा ३ सप्टेंबर २०१५ रोजी सातारा येथे मृत्यू झाला. डॉ. वर्षा खाडे यांनी पतीची सात वर्षे सेवा केली. याचा पळशी ग्रामस्थांना अभिमान वाटत
आहे.
मोलमजुरी करून लावले मुलीचे लग्न---रशिद शेख -- औंध
पळशी येथील रत्नाबाई वसंत माने या जिद्दी, धाडशी महिलेने पतीला आजारपणामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करत आपला संसार स्वत: चालविला आहे. गेली दहा ते बारा वर्षे त्या संसाराचा गाडा चालवित पतीची आईसारखी सेवा करत आहेत.
राजाचे कुर्ले येथील वसंत माने यांच्याशी रत्नाबार्इंचा १९७५ मध्ये विवाह झाला. वसंत माने यांचा लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय होता. हे जोडपे १९८९ मध्ये पळशीत राहण्यास आले. संसाराचा गाडा कसाबसा चालला असतानाच त्यांना दोन कन्यारत्न प्राप्त झाले. २००२ मध्ये रत्नाबार्इंवर एक शस्त्रक्रिया करावी लागली. यासाठी आर्थिक झळ बसली असतानाच २००४ मध्ये पतीला पक्षाघाताचा झटका आला. त्यामध्ये त्यांची एक डावी बाजू संपूर्ण गेली. या घटनेने कुटुंब हादरून गेलं. कुटुंबातील कर्त्या पुरुषावर ही वेळ आल्याने काय करावं तेच कळेना. सगळ्या प्रकारचे औषधोपचार केले. मात्र, इलाज झाला नाही. घरात बसून चालणार नव्हतं. हे ओळखून मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून एका मुलीचं लग्न लावून दिलं.
आदर्श शेती करून
अपंग पतीचं दु:ख हलकं
सूर्यकांत निंबाळकर ल्ल आदर्की
आदर्की खुर्द येथील रेखा मधुकर निंबाळकर हिने वाघोशी येथील नवनाथ एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. पती एका पायाने अपंग असूनही तिने कष्टाने शेती केली. केवळ शेतीच केली नाही तर वीस एकर जमीन खरेदी करून महिलाही कमी नाहीत, हे सिद्ध केलं आहे.
आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या रेखा हिने वाघोशी येथील नवनाथ एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. पती एका पायाने अपंग आहेत, हे विसरून जिद्दी रेखा यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पतीचे मार्गदर्शन आणि सासू-सासऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी शेती व्यवसायात लक्ष घातले. पाण्याचे योग्य नियोजन करून ठिबक सिंचनद्वारे शेती केली.
डाळिंबाची लागवड केली. दरम्यान, पती गावच्या सोसायटीत सहायक सचिवपदी काम करू लागल्याने शेती व मुलांची जबाबदारी रेखा यांनी स्वत: पेलली आहे.
हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करून
योगिता महांगडे यांनी तारला संसार
संजीव वरे ल्ल वाई
पसरणीतील प्रकाश बबन महांगडे यांना सहा वर्षांपूर्वी काम करत असताना पायाला दुखापत झाली. यामध्येच त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यातून ठीक होत असतानाच पायाला त्रास होऊ लागला अन् काही काळांनी त्यांचे दोन्ही खुबे बाद झाल्याने प्रकाश महांगडे अंथरुणाला खिळून होते. या परिस्थितीत पत्नी योगिता महांगडे यांनी जवळच्याच हॉटेलात स्वयंपाकाचे काम करून पतीला धीर दिला.
पतीनं काबाड कष्ट करावेत, संसाराचा भार पेलावा हे परंपरागत चालत आले असले तरी योगिता महांगडे याला अपवाद ठरल्या. आजारपणामुळे पतीची नोकरी गेली. घरात तीन मुलं. त्यांचं शिक्षण, पालनपोषण करताना कुठंही कमी पडता कामा नये. हाच विचार करून योगिता यांनी हॉटेलात स्वयंपाकाचं काम स्वीकारलं. त्यातून दरमहा तीन हजार रुपये पगार मिळू लागला. त्यातून घरखर्च, मुलांचे शिक्षण, पतीचे औषध भागवावे लागत होते.
योगिता यांनी जिद्द सोडली नाही. पतीची शस्त्रक्रिया केली तर ते पुन्हा चालतील, अशी आशा वाटत आहे.