पाणीबचतीच्या संदेशांचा मोबाईलवर पाणलोट
By Admin | Updated: March 9, 2016 01:17 IST2016-03-09T01:17:02+5:302016-03-09T01:17:16+5:30
काटकसरीने वापर करण्याचे आवाहन : ‘सोशल’ विषय सोशल मीडियावर चांगलाच रंगला...

पाणीबचतीच्या संदेशांचा मोबाईलवर पाणलोट
सचिन काकडे -- सातारा --यंदा पावसाने पाठ फिरवली असून, उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेला तर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. त्यामुळे ‘पाण्याचा अतिरेक टाळून त्याचा काटकसरीने वापर करा,’ ‘पाणी आणि वाणी जपून वापरा,’ अशा प्रकारच्या अनेक संदेशांच्या माध्यमातून शोशल मीडियावर पाणी बचतीबाबत जागृती केली जात आहे.
पाऊस कमी झाल्याने यंदा जलस्त्रोत उन्हाळ्यापूर्वीच आटले आहे. परिणामी सातारा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बळीराजासह अनेकांची धडपड सुरू झाली असताना शोशल मीडियावरही दरदरोज पाणी बचतीच्या संदेशांचा महापूर लोटत आहे.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी आहे तर जीवन आहे. त्यामुळे किमान पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा काटकसीने वापर करा. रोज गाड्या धुवू नका, अंगणात पाणी श्ािंपडू नका,’ असे शेकडो संदेश सध्या सोशल मीडियावर झळकू लागले आहे. व्हॉट्स अॅप किंवा फेसबूकवर आलेला संदेश झटपट दुसऱ्या ग्रुपमध्ये फिरताना दिसत आहे. अनेक जण हे संदेश ‘लाईक’ करून तत्काळ पुढे पाठवितात. अशा व्यक्तींना ‘केवळ फॉरवर्ड करू नका तर प्रत्यक्ष कृती करा’ अशी ‘कमेंट’ ही लगेच दिली जात आहे.
बऱ्याचदा आपण पहाटे नळाला पाणी येताच घरातील शिळे पाणी ओतून टाकतो व ताज्या पाण्याने भांडी भरतो. खरं तर धरणात किंवा तलावातील पाणी हे ताजं नसतंच. ते पावसाळ्यात साठलेलं पाणी असतं. फक्त ते पाईपलाईनद्वारे दररोज सोडलं जातं आणि आपण हे पाणी ताजं म्हणून वापरतो. गृहिणींनी या गोष्टीचा विचार करून पाण्याची बचत करावी, पाणी ओतून न देता त्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्लाही गृहिणींना सोशल मीडियाद्वारे दिला जात आहे.
माणसांप्रमाणे मुक्या जनावरांनाही पाण्याची तितकीच गरच भासते. त्यामुळे आपल्या घरावर, घराशेजारी अथवा झाडावर पाण्याने भरलेल्या बाटल्या, मडकी ठेवून मुक्या प्राण्यांवर ओढावणारे संकट टाळा असे आवाहनही सोशल मीडियाद्वारे केले जात आहे.
घरातील कपडे व अंघोळीचे पाणी हे वाया न घालविता त्याचा झाडांसाठी उपयोग करा. जेणे करून वृक्षवल्लींचे अस्तित्व टिकून राहील. असेही याठिकाणी ठणकावून सांगितले जात आहे.
अनेकांनी या संकटाचे गांभीर्य ओळखून पाण्याची काटकसर सुरू केलीही असेल. मात्र, केवळ या ‘सोशल’ विषय केवळ सोशल मीडियावर न राहता तो प्रत्येक्ष कृतीत आणने अत्यंत महत्त्वाचे आहे.
जादू वगैरे काही होणार नाही...
यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. धरणातील पाणी कमी झाले आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करू शकता:
१. रोज गाड्या धुवू नका.
२. अंगणात पाणी शिपडू नका.
३. सतत नळ चालू ठेऊ नका.
४. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करून त्या योगे पाणी वाचवूया.
५. घरातील गळके नळ दुरुस्त करा
६. सोसायटीतील गळकी टाकी , पाइप , बॉल कॉक दुरुस्त करा
७. या संकटाचा एकत्र सामना करूया.
वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादू वगैरे काही होणार नाही; पण नक्की चांगली बातमी पसरवल्याचे समाधान मिळेल.. अशा प्रकारच्या संदेशांमधून सोशल मीडियावर पाणीबचतीबाबत प्रबोधन केले जात आहे.