सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीतच पाणी टंचाई; 'या' तालुक्यात टँकर सुरू
By नितीन काळेल | Updated: February 21, 2025 18:32 IST2025-02-21T18:31:56+5:302025-02-21T18:32:27+5:30
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार

संग्रहित छाया
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच टंचाई सुरू झाली असून माण तालुक्यातील सहा गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकर सुरू झाले आहेत. या टॅंकरवर १० हजारांहून अधिक लोकांची तहान अवलंबून आहे. तर लवकरच टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले होते. पण, माण तालुक्यातील काही भागात पाऊस कमी झाला होता. यामुळे पाऊस कमी झालेल्या भागात टॅंकर यंदा लवकर सुरू करावे लागतील असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कारण, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत.
माण तालुक्यात यंदा लवकर टंचाई परिस्थिती उद्भवलीय. मागील चार दिवसांपासून माणमधील सहा गावांना आणि वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावांना सध्या टॅंकर सुरू आहेत. माणमधील आणखीही काही गावांनी टॅंकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे माण तालुक्यात टॅंकरची संख्या वाढणार आहे.
६७ वाड्यांना ही झळ..
माण तालुक्यात ६ गावे टंचाईग्रस्त आहेत. तसेच त्या अंतर्गत ६७ वाड्यांना ही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सध्या १० हजार १३२ नागरिकांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.
९ हजार पशुधन ही बाधित..
माणमध्ये पाणी टंचाईने नागरिक बाधित आहेत. तसेच पशुधनालाही पाणी मिळणे अवघड झालेले आहे. सध्या टंचाईग्रस्त गावातील ९ हजार ७० पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.
८ टॅंकर सुरू..
जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू झाले होते. यंदा मात्र, फेब्रुवारीतच सुरूवात झाली आहे. माणमध्ये सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. हे सर्व टॅंकर शासकीय आहेत. या टॅंकरना दररोज २९ खेपा मंजूर आहेत. तसेच टंचाईच्या गावात ३ विहिरी आणि एका बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.