टंचाई वाढणार; ४७३ गावांना झळ बसणार! अडीच महिने दाहकता राहणार
By नितीन काळेल | Updated: March 14, 2025 06:36 IST2025-03-14T06:36:29+5:302025-03-14T06:36:50+5:30
शासनाला आराखडा सादर : टंचाई निवारणासाठी १४ कोटी खर्चाचा अंदाज

टंचाई वाढणार; ४७३ गावांना झळ बसणार! अडीच महिने दाहकता राहणार
नितीन काळेल
सातारा : जिल्ह्यात यावर्षी टंचाईला मार्च महिन्यातच तोंड फुटले असून पुढील अडीच महिने दाहकता राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. त्यानुसार एप्रिल ते जूनदरम्यान ४७३ गावे आणि ६५७ वाड्यांना टंचाईची झळ बसू शकते. यासाठी १४ कोटी ६२ लाख खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाऊस अधिक पडला, तरी उन्हाळ्यात टंचाईची स्थिती जाणवतेच. त्यामुळे प्रशासनाकडून टंचाईच्या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. त्यातच जिल्ह्यात गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला होता. पर्जन्यमान अधिक होऊनही यंदा टंचाई लवकरच जाणवू लागली आहे. कारण माण तालुक्यात मागील आठवड्यापासून शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू झालाय, तसेच टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडूनही संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावरून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय. या आराखड्यानुसार जिल्ह्यात यावर्षी टंचाई अधिक जाणवणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
माणमध्ये ८ कोटींवर खर्चाचा अंदाज...
प्रशासनाने एप्रिल ते जूनदरम्यानचा संभाव्य आराखडा तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय. हा आराखडा १४ कोटी ६१ लाख २० हजारांचा आहे. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई जाणवू शकते. येथील टंचाई निवारणासाठी ८ कोटी ६० लाख ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यात २ कोटी ७ लाख, पाटणला सुमारे १ कोटी २१ लाख खर्च होण्याचा अंदाज आहे, तसेच खटाव तालुक्यात ३४ लाख, खंडाळा ७ लाख, फलटण तालुका ८६ लाख ५७ हजार, वाई ६५ लाख १५ हजार, जावळीत ३६ लाख तर क-हाडला १४ लाख ५८ हजार, महाबळेश्वर तालुक्यातही २९ लाख ४४ हजार रुपये टंचाईवर खर्च होण्याचा अंदाज आहे.
माणला ८९ गावे, ५३२ वाड्यांना टंचाई अंदाज...
तीन महिन्यात सर्वाधिक टंचाई माण तालुक्यात जाणवण्याचा अंदाज आहे. ८९ गावे आणि ५३२ वाड्यांना झळ बसू शकते. कोरेगाव तालुक्यात १३९ गावे १३ वाड्या, खटाव ३२ गावे आणि ३३ वाड्या, खंडाळा ६ गावे, फलटणला ५८ गावांत, जावळीत ३३ गावे व १४ वाड्या महाबळेश्वरला १३ गावे आणि ७वाड्यांत, कन्हाड तालुक्यात २३ गावांत, तर पाटण तालुक्याला ५८ गावे आणि ३३ वाड्यांत झळ बसण्याचा अंदाज आहे.