टंचाईग्रस्त गावांतील शेतीसाठी पाणीउपसा बंद! कऱ्हाड तालुका : विद्युत मोटारींचे कनेक्शन तत्काळ तोडण्याच्या
By Admin | Updated: March 15, 2016 00:48 IST2016-03-14T21:28:16+5:302016-03-15T00:48:09+5:30
वीजवितरणला सूचना; ५९ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या--पाणी टंचाई आढावा बैठक

टंचाईग्रस्त गावांतील शेतीसाठी पाणीउपसा बंद! कऱ्हाड तालुका : विद्युत मोटारींचे कनेक्शन तत्काळ तोडण्याच्या
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यामधील टंचाई घोषित करण्यात आलेल्या ५९ गावांमध्ये शेतींसाठी मोटरीद्वारे पाणी उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यावर तत्काळ बंदी घालण्यात येत आहे. अशा गावांत शेतीसाठी विद्युत मोटारीद्वारे केल्या जाणाऱ्या पाणी उपसापेक्षा लोकांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाणीटंचाई घोषित असलेल्या गावांतील शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची कनेक्शन तत्काळ वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तोडावे, अशा सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी दिल्या. येथील दैत्यनिवारण मंदिर परिसरात यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात सोमवारी कऱ्हाड तालुका पाणीटंचाईची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार राजेंद्र शेळके, सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब चव्हाण, राजेंद्र बामणे, भाग्यश्री पाटील उपस्थिती होते. प्रांताधिकारी पवार म्हणाले, ‘सध्या जिल्ह्याप्रमाणे कऱ्हाड तालुक्यातील काही भागांतही मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात उद्भवलेल्या पाणीटंचाईसाठी मार्ग काढण्यासाठी तीन महिने असून, या तीन महिन्यांत ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यातील १९८ गावांमधील ५९ गावे ही पाणीटंचाई घोषित गावे आहेत. त्या गावांमध्ये अति तीव्र पाणी टंचाई असल्याने त्या गावांमध्ये तत्काळ निर्णय घेऊन तशा उपाय योजना करणे आवश्यक आहे. तसेच टंचाई घोषित गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजना निर्माण करणे गरजेचे आहे. अशा गावांमध्ये शेतीसाठी विद्युत मोटारींद्वारे पाणी उपसा केला जात आहे. तो तत्काळ वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बंद करावा, तसेच ग्रामस्थांना पिण्यासाठीच पाणी उपलब्ध करून द्यावे.’ कऱ्हाड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कामांची माहिती दिली. तसेच तालुक्यात प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून कामे केली जात असल्याचे सांगितले. दरम्यान, आरळेकरांना किवळ व वाघेरी या गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नळ पाणी योजनेसाठी अंदाजपत्रक पाठविण्यात यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. आढावा बैठकीदरम्यान म्हासोली येथील सरपंच कमल देवकर यांनी गावात नळपाणी पुरवठा योजनेतून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली आहे. टाकी कोणत्याही स्थितीत ढासळण्याची शक्यता असून, अशा टाकींतून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी प्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कामे करण्यास चालढकल केली जात असल्याचे सांगितले. धोकादायक स्थितीत असलेल्या टाकीऐवजी दुसरी टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी केली. यावर म्हासोली येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या कामाचा प्रस्ताव अंदाजपत्रकात समाविष्ट करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी किवळ येथील खोडजाईवाडीतील बंधाऱ्यातून विद्युत मोटारीच्या साह्याने पाणी उपसा शेतीसाठी केला जात आहे. तो तत्काळ बंद करण्यात यावा तसेच विद्युत पुरवठा बंद करून कार्यवाही करावी, अशा सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी वीजवितरण अधिकाऱ्यांना दिल्या. तर अंधारवाडी येथे जुनी पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात आलेली टाकी जुनी झाली आहे. तसेच या ठिकाणी १ हजार ३०० मीटरची पाईपलाईनही टाकण्यात आली आहे. यावेळी धोंडेवाडी, बेलवडे बुद्रुक, पवारवाडी, हरपळवाडी, हजारमाची, वाघेरी, शामगाव आदी गावांतील पाणी पुरवठ्याच्या कामांविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीस पाणीटंचाई असलेल्या गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व पाणी पुरवठा योजनेतील अधिकारी, ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी) अन् यादव भडकले.. दैत्यनिवारणी मंदिर परिसरातील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी पार पडली. यावेळी पाणी टंचाईसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा सुरू असताना गावातील पिण्याच्या पाण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविल्या जाव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांकडून केल्या जात होत्या. दरम्यान, बैठकीस उपस्थित असलेले कऱ्हाड तालुका उत्तरचे राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना राग अनावर झाला. त्यांनी ‘चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक्ष कामे सुरू करा, पिण्याच्या पाण्याच्या समस्या मार्गी लावा,’ असा सवाल अधिकाऱ्यांना केला. आठ गावांतील ग्रामस्थांना सूचना कऱ्हाड तालुक्यात पाणीटंचाई असलेल्या व अंदाजपत्रक मंजूर असलेल्या आठ गावांतील ग्रामस्थांनी तत्काळ विंधन विहिरी घेण्यासाठी गावपातळीवर चर्चा करून विंधन विहिरी घ्याव्यात. अन्यथा जिल्हा परिषदेमार्फत येणाऱ्या मशिनीद्वारे विंधन विहिरी खोदव्यात , अशी सूचना गटविकास अधिकारी फडतरे यांनी केली. त्यामध्ये अंतवडी, बेलदरे, खोडशी, पाल वडगाव रोडवस्ती, रिसवड, शेरे, वाघेरी, येवती या गावांचा समावेश आहे.