सातारा जिल्हा परिषद, नगरपालिकांची मतदार यादी मयत, दुबार नावांसह; सुधारित यादी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 19:06 IST2025-10-18T19:04:47+5:302025-10-18T19:06:18+5:30
शहरी व ग्रामीण भागात अनेकांची मते

सातारा जिल्हा परिषद, नगरपालिकांची मतदार यादी मयत, दुबार नावांसह; सुधारित यादी देण्याची मागणी
सातारा : राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै रोजीच्या विधानसभा मतदार यादीनुसार घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे १ जुलैनंतर झालेली मयत, दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळली अथवा समाविष्ट केली जाणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी असे दुबार मतदार ओळखण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुधारित मतदार यादी काढण्याची मागणी होऊ लागली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १६ जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीनुसार घेतल्या जाणार आहेत. निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करताना संबंधित विधानसभा मतदार यादीत कोणतीही नवी नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे अथवा दुरुस्ती करणे याला आयोगाने अनुमती दिलेली नाही.
परंतु, मतदारांचे स्थलांतर, मयत, दुबार तसेच नवीन मतदार नोंदणी झाली असल्यास त्यांची नावे मतदार यादीत नसणार आहेत. त्यामुळे असे नागरिक मतदान केंद्रांवर मतदान करण्यास आल्यानंतर त्यावेळी गोंधळ उडू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने सुधारित यादी काढण्याची मागणी होत आहे.
नावे पडताळून यादी तयार करण्याचे आदेश
दुबार, स्थलांतरित किंवा मयत मतदारांची नावे पडताळून त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश आयोगाकडून देण्यात आले आहेत. संबंधित उमेदवार आणि मतदान केंद्रांना या याद्या मतदानापूर्वी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयोगाच्या आदेशानुसार, नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंतच आवश्यक दुरुस्ती करता येईल. त्यानंतर मात्र मतदार यादी अंतिम मानली जाईल.
शहरी व ग्रामीण भागात अनेकांची मते
मतदार यादीतून दुबार नावे वगळण्याची कार्यवाही संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. दुबार नावे मतदार यादीत राहण्याची शक्यता फार कमी असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तथापि, शहरी व ग्रामीण भागात काही मतदारांची नावे आहेत. काही नागरिक मुंबईत महापालिकेला मतदान करून पुन्हा गावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीलाही मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुबार नावे वगळण्याची प्रक्रिया गतीने करून सुधारित मतदार यादी जारी करण्याची मागणी होत आहे.