पोटासाठी वानरसेनेकडून पर्यटकांचे मनोरजंन!
By Admin | Updated: October 1, 2015 00:29 IST2015-09-30T21:22:56+5:302015-10-01T00:29:33+5:30
यवतेश्वर घाटात कसरती : पर्यटक देतात विविध पदार्थांची मेजवानी

पोटासाठी वानरसेनेकडून पर्यटकांचे मनोरजंन!
पेट्री : सातारा-बामणोली मार्गावरील यवतेश्वर घाटात पर्यटकांच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज असणारी वानरसेना आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी पर्यटकांचे मनोरंजन करते आहे. घाटातील ही वानरसेना सकाळी पर्यटकांना गुडमॉर्निंग तर संध्याकाळी गुडइव्हिनींग करण्यासाठी नेहमीच हजर असते. गेल्या कित्येक वर्षांपासून ही वानरसेना येथे तळ ठोकून आहे. उन्हाळ्यात धबधबा कोरडा पडल्यावर एकेक थेंब झेलण्यासाठी ही वानरसेना कसरती करताना दिसते. जरी उन्हाळयात पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवली तरी तिन्ही ऋतूत ही वानरसेना आपले अस्तित्व टिकवून आहे .
सातारा-बामणोली मार्गावरील कास पठार, कास तलाव परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. सध्या सुरू असलेला कास पठारावरील फुलोत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक यवतेश्वर घाटातून ये-जा करत असतात. घाटातील कोसळणारा धबधबा व त्यासमोर एका ओळीत बसणारी वानरसेना हे दृश्य मनाला एवढे हेलावून टाकते. धबधब्यानजीक वानरसेनेकडून होणाऱ्या कसरती पर्यटकांना येथे थांबण्यास भाग पाडतात. यावेळी बच्चेकंपनी कुरकुरे, स्नॅक्स, चणे, फुटाणे, पाव, डब्यातील चपाती, मक्याची कणसे, विविध फळे अशा प्रकारची खाद्यपदार्थ वानरांना खायला देतात. सोबत खाऊ नसेल तर बच्चेकंपनी आपल्या आईवडिलांना दुकानातून खाऊ खरेदी करण्यासाठी हट्ट धरतात.
उन्हाळ्यातील कडक ऊन, पावसाळयातील जोरदार पाऊस, व हिवाळ्यातील थंडी सहन करत ही वानरसेना यवतेश्वर घाटातून जाणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करते. (वार्ताहर)
घाटातील रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. यावेळी वानरसेना व त्यांची पिल्लेदेखील इकडून तिकडे उड्या मारताना दिसतात. अशावेळी वानराचा अपघात होणार नाही, यासाठी कमी वेगाने वाहने चालवावीत. गेल्या दोन महिन्यापूर्वी अशाच भरधाव वाहनाच्या वेगाने एका वानराला जीव गमवावा लागला होता.
- विशाल पवार , पर्यटक सातारा
वानरसेनाही पर्यटकांची करतेय गंमत
वानरांचा फोटो काढण्यासाठी एका पर्यटकाने आपले दुचाकी वाहन धबधब्यानजीक संरक्षक कठड्याशेजारी उभे केले होते. दरम्यान, फोटो काढण्यात मग्न असताना दुचाकीला लागलेली चावी एका वानराने पळविली. प्रयत्न करूनही वानर आपल्या हातातील चावी सोडायला तयार होत नव्हते. त्यावेळी ‘माकडे आणि टोपीवाला’ या कथेचा बोध लक्षात आल्यावर त्या वानरांना खाऊ देताच वानराने चावी जमिनीवर फेकून दिली अन् चालकाच्या जिवात जीव आला.