सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम !
By नितीन काळेल | Updated: March 11, 2025 19:33 IST2025-03-11T19:32:19+5:302025-03-11T19:33:14+5:30
शाश्वत विकासाकडे वाटचाल : जिल्हा परिषदेचा ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम

सातारा जिल्ह्यातील गावे होणार १०० टक्के सौरग्राम !
नितीन काळेल
सातारा : सौरउर्जा काळाची गरज झाली असून, आता सातारा जिल्हा परिषदही जिल्ह्यात ‘मिशन शाश्वत ग्रामपंचायत’ उपक्रम राबवत आहे. त्यामधून अधिकाधिक गावे १०० टक्के सौरग्राम करण्यात येणार आहेत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करून हरितउर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने १०० टक्के सौरऊर्जा ग्राम होण्याचा बहुमान नुकताच मिळविला आहे. यासाठी १५व्या वित्त आयोगाचा निधी, माझी वसुंधरा अभियान आणि इतर योजनांच्या माध्यमातून मिळालेल्या बक्षीस रकमा, लोकवर्गणी, सीएसआर फंड अशा विविध निधीच्या माध्यमातून गाव १०० टक्के सौरऊर्जा स्वयंपूर्ण ग्राम करून शाश्वत विकासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
आता सौर ऊर्जाग्राम निर्मितीची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याअंतर्गत गावे १०० टक्के सौरउर्जा ग्राम करण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच या गावांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याची तयारी दर्शविली आहे.
पहिल्या टप्प्यात या गावांना शाश्वत उर्जेच्या आधारे उर्जा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, जलजीवन मिशन, मागेल त्याला सौर कृषिपंप, पंधराव्या वित्त आयोगामार्फत मिळणारा निधी, लोकवर्गणी आणि सीएसआर फंडातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून गावाची विजेची गरज गावातच भागवण्यासाठी ही मोहीम आहे तसेच उपलब्ध योजना आणि निधीची कल्पक सांगड घालून ही गावे ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यात येणार आहेत.
शाळा, पथदिवे, पाणीपुरवठा योजनांसह घरेही साैरऊर्जेद्वारे
सौरग्राम योजनेत गावातील घरे, शाळा ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा योजना, पथदिवे आणि इतर कामांसाठी लागणारी १०० टक्के वीज सौरऊर्जेद्वारे गावातच निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. हरित ऊर्जेच्या आधारे गाव उर्जा स्वयंपूर्ण होत असल्याने ही वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने होत आहे. तसेच प्रत्येक घराच्या छतावर आता पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेतून गाव ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी १०० टक्के सौर ऊर्जा ग्रामयोजनेत सहभागी व्हावे. तसेच जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मिशन शाश्वत ग्रामपंचायत उपक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.