कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:37+5:302021-06-22T04:25:37+5:30
बामणोली : कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील राहून चालणार नाही. आपले गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे आणि ते ...

कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी सतर्क राहावे
बामणोली : कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी होत असला तरी गाफील राहून चालणार नाही. आपले गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे आणि ते कायम कोरोनामुक्त राहिले पाहिजे, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आपले गाव आणि भागाच्या कोरोनामुक्तीसाठी ग्रामस्थांनी कायम सतर्क राहावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि त्यांच्या आमदार फंडातून बामणोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त कोरोना केअर सेंटर व आपटी आरोग्य उपकेंद्र येथील कोरोना विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, डॉ. ज्ञानेश्वर मोरे, आदी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘सर्वत्र कोरोनाने हाहाकार केलेला असताना ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड कमी पडत असल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. हे लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, बामणोली याठिकाणी आमदार फंडातून दहा बेडचे सुसज्ज असे ऑक्सिजनयुक्त कोरोना सेंटर सुरू केले. तसेच नवतरुण ग्रामविकास मंडळ, मुंबई, आपटी व बजरंग सपकाळ यांच्या अर्थसहाय्यातून आपटी येथे उभारण्यात आलेला वीस बेडचा विलगीकरण कक्ष या दुर्गम भागातील रुग्णांसाठी संजीवनी ठरणार आहे.
बामणोली येथे दहा बेड व आपटी येथे वीस बेड असल्याने यापुढील काळात या भागातील लोकांना मेढा किंवा सातारा याठिकाणी जाऊन बेड शोधत बसण्याची वेळ येणार नाही. तरीदेखील भागातील सर्व ग्रामस्थांनी शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळावेत व प्रशासनाला सहकार्य करावे.
यावेळी समाजसेवक ज्ञानदेव रांजणे, राम पवार, राजेंद्र संकपाळ, बामणोलीच्या सरपंच जयश्री गोरे, प्रकाश सुतार, बामणोली भागातील विविध गावांचे सरपंच, सदस्य, पोलीसपाटील, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : २१ बामणोली
बामणोली (ता. जावली) येथील कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सोपान टोम्पे, राजेंद्र पोळ, सतीश बुद्धे, आदी उपस्थित होते.