.."त्या" फलकांची गावोगावी चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:54+5:302021-06-22T04:25:54+5:30
सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. त्या ...

.."त्या" फलकांची गावोगावी चर्चा!
सातारा व सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. गावोगावी तिन्ही पॅनेलचे फलक झळकत आहेत. पण संस्थापक पॅनेलचा ''फरक आढळल्यास एक लाखाचे बक्षीस'' या आशयाचे लावलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा हा धर्मकाटा असल्याचे सत्तेवर असणारा प्रत्येक जण सांगत असतो. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतल्याचे प्रमाणपत्र याचा आधार दिला जातो. तरीही विरोधक त्यावर शंका उपस्थित करतात. शेतकरी संघटना तर नेहमीच वजन काट्याबाबत आक्षेप घेताना दिसतात. त्यामुळे कारखान्याचा वजन काटा अचूक आहे की नाही याबाबत नेहमीच उलटसुलट चर्चा होत राहतात.
या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न म्हणूनच संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांची छबी असणारे फलक कृष्णेच्या कार्यक्षेत्रात झळकताना दिसतात. त्यात सभासदांनी स्वतःचा ऊस खासगी वजन काट्यावर वजन करून आणावा, त्यानंतर तो ऊस कारखान्याच्या वजन काट्यावर वजन करावा, त्यात जर फरक आढळला तर एक लाखाचे बक्षीस देण्याचे घोषित करण्यात आले आहे. या माध्यमातून सभासदांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा फंडा वापरला गेला आहे. त्याला किती यश येते हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागेल. पण सध्या त्या फलकाची चर्चा सर्वत्र आहे हे नक्की.
चौकट
दरम्यान, या फलकाची छबी सध्या अनेकांच्या फेसबुक व मोबाईल स्टेटसवर पाहायला मिळत आहे. व्याख्याते प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या फेसबुकवरही ही छबी असून, ‘असा बॅनर लावायला हिंमत आणि प्रामाणिकपणा लागतो’ असे वर नमूद केले आहे. त्यामुळे या फलकाची चर्चा कृष्णा कारखाना कार्यक्षेत्राबाहेरही सुरू असल्याचे स्पष्ट होते.
फोटो: गावोगावी लावण्यात आलेले फलक.