दीपक देशमुख
सातारा : विधान परिषदेतील ९ सदस्यांची मुदत १२ मे रोजी संपत असून, जागांसाठी जूनमध्ये निवडणूक हाेऊ शकते. भाजपतून विधान परिषदेवर जाण्यासाठी संधी असल्यामुळे सातारा जिल्ह्यातून काहीजणांनी फिल्डिंग लावली आहे. वरिष्ठ स्तरावर पक्षातील विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटातील शशिकांत शिंदे यांना संधी मिळाली होती. तथापि, संख्याबळामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य आहेत. त्यातील ३० सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. त्यातील ९ जणांचा मुदत येत्या १२ मे रोजी संपत आहे. नुकताच विधान भवनात या सदस्यांचा निरोप सोहळा पार पडला. यानंतर दीड महिन्यात रिक्त होणाऱ्या जागांवर वर्णी लागावी, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये भाजपला संख्या बळाच्या जोरावर अधिक संधी आहे. वरिष्ठ स्तरावरून जिल्ह्यातील संभाव्य नेत्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. अनेकांनी जिल्ह्यातील मंंत्र्यांसह वरिष्ठ नेत्यांचीही गाठ घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.
विधान परिषदेत खमका नेताआमदार शशिकांत शिंदे यांचा २०१९मध्ये विधानसभेला पराभव झाला तरी त्यानंतर विधान परिषदेवर वर्णी लागली होती. त्यावेळी राष्ट्रवादी एकसंध असल्यामुळे संख्याबळाच्या जोरावर आमदार शिंदे यांचा मार्ग सुकर झाला. परंतु, त्यानंतर २०२२मध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, तर २०२६मध्ये राष्ट्रवादीला (शरद पवार) अपेक्षित यश मिळाले नाही. सदस्यसंख्या कमी असल्याने विधान परिषदेचे दोर कापले जाणार असल्यामुळे आमदार शिंदे यांना २०२९ची तयारी कसून करावी लागणार, यात शंका नाही.
विधानसभेची संधी हुकलेल्यांकडून मोर्चेबांधणी
- विधानसभेला संधी हुकलेल्या भाजपच्या नेत्यांनी विधान परिषदेला फिल्डिंग लावली आहे.
- धैर्यशील कदम यांनी २०१९मध्ये कराड उत्तर विधानसभा निवडणूक लढवली, तर २०२४मध्ये त्यांनी तिकीट डावलले तरी बंडखोरी केली नाही. जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांतून उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे.
- विक्रम पावसकर यांनी बूथलेव्हलपासून प्रदेशपातळीवर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाबाबतही सकारात्मक विचार वरिष्ठ नेत्यांमधून होऊ शकतो.
- पाटण मतदारसंघात देसाई आणि पाटणकर हे दोनच गट आहेत. त्यापैकी पाटणकर गटाचे नेते सत्यजित पाटणकर यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही भाजपतून विधान परिषदेवर संधी मिळण्याची मागणी होत आहे. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांना शह देण्यासाठी पाटणकर यांना ताकद देण्याबाबतही पक्षातून विचार सुरू आहे.
- भाजपमध्ये संघटना स्तरावरील कार्यकर्त्यांमधूनही काही नावांबाबत चर्चा आहे. यामध्ये विठ्ठल बलशेटवार यांचेही नाव चर्चेत असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.
Web Summary : With Legislative Council elections looming, Satara BJP hopefuls are actively lobbying. Vikram Pavaskar, Dhairyashil Kadam, and Satyajit Patankar are key contenders. NCP's Shinde faces challenges due to reduced party strength. BJP aims to strengthen its presence.
Web Summary : विधान परिषद चुनावों के साथ, सतारा भाजपा के उम्मीदवार सक्रिय रूप से लॉबिंग कर रहे हैं। विक्रम पावस्कर, धैर्यशील कदम और सत्यजित पाटनकर प्रमुख दावेदार हैं। राकांपा के शिंदे को पार्टी की कम ताकत के कारण चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। भाजपा का लक्ष्य अपनी उपस्थिति को मजबूत करना है।