सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विक्रेत्यांनी भरविला बाजार
By सचिन काकडे | Updated: May 14, 2025 19:34 IST2025-05-14T19:34:06+5:302025-05-14T19:34:55+5:30
सातारा : सातारा पालिकेने जाहीर केलेल्या नो हॉकर्स झोनचा प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विक्रेत्यांनी भरविला बाजार
सातारा : सातारा पालिकेने जाहीर केलेल्या नो हॉकर्स झोनचा प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळू लागला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित विक्रेत्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाजार भरवून उपोषण सुरू केले. या अनोख्या उपोषणाची शहरात दिवसभर चर्चा झाली.
मोती चौक ते ५०१ पाटी या रस्त्यावर छोटे-मोटे विक्रेते गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. शहराची ही मुख्य बाजारपेठ असल्याने शहरी व ग्रामीण भागांतील नागरिक येथे मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. सण, उत्सव काळात रस्त्यावरील विक्रेते, दुकानांचे साहित्य, लोखंडी जाळ्या, दुचाकी वाहने, आदींमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ती टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोती चौक ते ५०१ पाटी या मार्गावर नो हॉकर्स झोन जाहीर केला. विक्रेत्यांना या मार्गावर बसण्यास निर्बंध घालण्यात आले. संबंधित विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. तरीदेखील या विक्रेत्यांनी विविध संघटनांचा हाताशी धरून पालिकेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
मंगळवारी पालिकेतील बैठक निष्फळ ठरल्याने या विक्रेत्यांनी बुधवारपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. काही विक्रेत्यांनी उपोषणस्थळी बाजार भरवून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पालिका प्रशासनाकडून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.