अनलॉकनंतर भाजीपाला महाग; कांदा ५ रुपयांनी वाढला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:26 IST2021-06-22T04:26:18+5:302021-06-22T04:26:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता ...

अनलॉकनंतर भाजीपाला महाग; कांदा ५ रुपयांनी वाढला...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनामुळे निर्बंध असले तरी आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला असल्याने काही अंशी शिथिलता आली आहे. बाजारपेठ खुली असून भाज्याही मिळू लागल्या आहेत. पण, भाज्या महाग झाल्या आहेत. वांग्यानाही भाव मिळू लागलाय. तर, वाटाणा १०० रुपये किलोपुढे गेला आहे.
जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, माण, खटाव, फलटण, कऱ्हाड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला जिल्ह्यात विकला जातो. तसेच पुणे आणि मुंबई बाजारांतही पाठविला जातो. जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन होता. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व भाजीविक्रेत्यांवरही संकट आले होते. कारण, शेतमाल विकता येत नव्हता. मात्र, आता जिल्ह्याचा स्तर तीनमध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध सैल झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला बाजारपेठ खुली झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
सध्या भाज्यांचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे. पण, पाऊस होत असल्याने भाजीपाला बाहेर काढताना अडचणी येत आहेत. काही ठिकाणच्या मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बहुतांश भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. फक्त टोमॅटो आणि कोबीला दर कमी मिळत आहे.
चौकट :
टोमॅटो २० ३०
बटाटा ३० ४०
भेंडी ४० ६०
मिरची ४० ६०
कारले ६० ८०
शेवगा ४० ८०
वाटाणा ६० १००
वांगे ४० ६०
....................
चौकट
पुन्हा वरणावर जोर...
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांत भाज्या मिळविताना अडचणी येत होत्या. गल्लीत भाजीविक्रेते यायचे. पण, भाज्या चांगल्या मिळत नव्हत्या. आता भाजीविक्री सुरू आहे. पण, दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या पुढे आहे. महागाईमुळे अनेकवेळा वरण करावे लागते.
- रमा पवार, गृहिणी
......
सध्या बाजारात पालेभाज्या महागच झाल्या आहेत. कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. वांगी, भेंडी आणि वाटाण्याचा दर वाढत आहे. त्यामुळे अगोदरच महागाई त्यात पुन्हा भाज्यांची वाढ झाल्याने सामान्यांना अधिक झळ पोहोचू लागली आहे.
- सुवर्णा काळे, गृहिणी
...............
म्हणून वाढले दर...
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन असतो. त्यामुळे भाजीपाला घेतला आणि पुढे मागणी नसेल तर काय करायचे. यामुळे शेतकरी अधिक प्रमाणात भाजीपाला घेत नाहीत. त्यातच सध्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस होत आहे. यामुळे शेतमाल रानातून बाहेर काढणे अवघड झाले आहे. यामुळेही साताऱ्यात भाज्यांचे दर वाढले आहेत.
- श्यामराव शिंदे, दुकानदार
......
बाजारात भाजीपाला कमी येतोय. याला कारण पाऊस आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी भाजीपाला कमी घेतलाय. भाज्यांना मागणी वाढलीय. अशा
कारणांमुळे भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. पण, लवकरच हे दर कमी होऊ शकतात.
- शरद शिंदे, विक्रेता
...............
शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा...
तीन महिन्यांपूर्वी भाजीपाला घेतला होता. पण, कोरोना रुग्ण वाढल्याने विकता आला नाही. आता भाज्यांचे दर वाढले आहेत. तरीही पाऊस सुरू आहे. भाज्यांवर रोग पडत आहे. यामुळे व्यापारीही भाव पाडून भाज्यांची खरेदी करत आहेत.
- राजाराम शिंदे, शेतकरी
.......
दोन महिन्यांपूर्वी मागणी कमी होती. तसेच विक्रीही करता येत नव्हती. त्यामुळे नुकसान झाले. आता भाजीपाला लागवडच नाही. त्यातच
बाजारपेठ खुली झाली आहे. पण, भाज्या मोठ्या प्रमाणात येत नसल्याने दर वाढला. माझ्याकडे आता भाज्याच नाहीत.
- तानाजी पाटील, शेतकरी
........
फोटो आहे...
.........................................................................