Satara: पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार, दुर्गभ्रमंतीसह जलसफारीचाही आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:30 IST2025-10-27T15:30:12+5:302025-10-27T15:30:27+5:30
वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो

Satara: पर्यटकांना अनुभवता येणार वासोट्याचा थरार, दुर्गभ्रमंतीसह जलसफारीचाही आनंद
सातारा : राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू अन् जिल्ह्याचे वैभव असलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला शनिवार, दि. १ नोव्हेंबरपासून पर्यटनासाठी खुला होत आहे. नैसर्गिक आपत्ती व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा किल्ला चार महिने पर्यटकांसाठी बंद होता. पावसाच्या उघडिपीनंतर सह्याद्रीतील पर्यटनस्थळे पर्यटनासाठी खुली झाली असून, यामुळे रोजगार व पर्यटनवाढीला चालना मिळणार आहे.
वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी, ट्रेकर्ससह पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो. सुटीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. घनदाट अरण्य, सदाहरित वृक्षराजी, अथांग जलाशयामुळे या परिसराला एक निराळे वैशिष्ट्य लाभले आहे. किल्ल्यावरून दिसणारे निसर्गाचे रूप विलक्षण ठरते.
येथील उंचच उंच कडे अन् प्रचंड खोल दऱ्या मनात धडकी भरवतात. वासोटा पर्यटन सुरू होत असल्याने या भागातील मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा, अंबवडे येथील बोट व तंबू व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वासोटा सफारीसाठी वनविभाग व बोटक्लबकडून शुल्क निर्धारित करण्यात आले आहे.
वासोटा किल्ला व परिसराला समृद्ध जैवविविधता लाभली आहे. हा किल्ला १ नोव्हेंबरपासून पर्यटक व गिर्यारोहकांसाठी खुला होत आहे. या किल्ल्याचे सौंदर्य अबाधित ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे पर्यटक व गिर्यारोहकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा. - विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव बामणोली