खंडाळा : ‘महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना राज्यात चांगले काम करीत आहे. सत्ता पाठीशी असल्याने लोकांच्या मूलभूत समस्या सोडविणे सहज शक्य आहे. गावोगावच्या प्रलंबित कामांसाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, त्यामुळे पक्षाची ताकद वाढीस लागेल. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान गरजेचे आहे. आगामी नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी सज्ज राहा,’ अशा सूचना शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांनी दिल्या.
खंडाळा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हाप्रमुख अजित यादव, तालुकाप्रमुख आदेश जमदाडे, उपतालुकाप्रमुख सचिन आवारे, विभागप्रमुख सागर ढमाळ, शहरप्रमुख बापूसाहेब गाढवे, प्रमोद शिंदे, शेखर खंडागळे प्रमुख उपस्थित होते.
लोणंद आणि खंडाळा नगरपंचायतीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. दोन्ही शहरांतील प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार देण्यासाठी घरोघरी पोहोचून लोकांच्या अडचणी समजून घ्या. प्रत्येक प्रभागात स्वतंत्रपणे शाखा तयार करून तरुण पिढीला पक्ष संघटनेत सहभागी करून घ्यावे. खंडाळा तालुक्यात सेनेची ताकद पूर्ववत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये योग्य ते बदल केले जातील. कोणतेही पद नावापुरते न राहता लोकांच्या उपयोगी पडले पाहिजे याची जाणीव ठेवून काम करा. लोकांच्या कामांसाठी पक्षाकडून हवं ते सहकार्य केले जाईल, असेही नितीन बानगुडे-पाटील यांनी स्पष्ट केले.
या सहविचार बैठकीसाठी खंडाळा, लोणंद नगरपंचायत क्षेत्रातील सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.