सातऱ्यात अवकाळी पावसाचा दणका; वीज पडून दोन म्हशी ठार, पिकांना फटका
By नितीन काळेल | Updated: March 15, 2023 21:18 IST2023-03-15T21:18:13+5:302023-03-15T21:18:27+5:30
साताऱ्यासह जावळी, वाई, पाटण तालुक्यात हजेरी

सातऱ्यात अवकाळी पावसाचा दणका; वीज पडून दोन म्हशी ठार, पिकांना फटका
सातारा : ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात बुधवारी सायंकाळच्या सुमारास सातारा शहरासह वाई, जावळी, पाटण तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. तर सातारा शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, प्रसिध्द पाचगणी येथील टेबललॅंड पठारावर वीज पडून दोन म्हशी ठार झाल्या आहेत.
जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यातच ढगाळ वातावरणही तयार व्हायचे. पण, पावसाची हजेरी नव्हती. मात्र, बुधवारी दुपारपासूनच जिल्ह्यातील वातावरण बदलले आणि सायंकाळी पाचनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने दणका दिला. सातारा शहरात तर सायंकाळी सातच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. तसेच विजाही चमकत होत्या. रात्री सवा आठपर्यंत कमी-अधिक स्वरुपात पाऊस पडत होता. यादरम्यान, शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला होता.
वाई तालुक्यातही पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास वाई शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. तर पावसामुळे ज्वारी, गहू, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, केळी, पपई व पाालेभाज्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वाई तालुक्यातीलच पूर्व भागात वेळे, सुरुर, वाहागाव, केंजळ, कवठे, चांदक, गुळुंब या गावातही पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. तर काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा तसेच अनेक बागायती पिकांचे नुकसान झाले. जावळी तालुक्यातील कुडाळ परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सर्वांचीच धांदल उडाली. यामुळे कुडाळचा आठवडा बाजार विस्कळीत झाला. मेघ गर्जनेसह सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
आठवडी बाजारात पळापळ...
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरात वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली. त्यातच मल्हारपेठचा आठवडी बाजार होता. पावसामुळे बाजारकरूंची पळापळ झाली. या पावसात कडबा भिजला. तर शाळूची कणसे काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.