Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 15:49 IST2021-05-22T15:46:39+5:302021-05-22T15:49:11+5:30
Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने एका युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. मल्हारपेठ विभागातील गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे.

Corona Cases In Satara : व्हेंटीलेटर बेडअभावी युवकाचा दुर्दैवी मृत्यू
मल्हारपेठ : व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने एका युवकाचा दुर्देवी मृत्यु झाला. मल्हारपेठ विभागातील गावात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ग्रामस्थांत धास्ती निर्माण झाली आहे.
ऐन तारुण्यात एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. अपुर्ण सुविधांमुळे अजून किती जणांचा जीव जाणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या व मृत्युचा कहर वाढत चालला आहे. यात पहिल्या लाटेत वयोवृद्ध नागरिकंना कोरोनाने लक्ष केले होते. मात्र दुसऱ्या लाटेचा विचार करता लहान बालकांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाने घेरले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाची दाहकता पाहता सर्वजण दहशतीच्या छायेखाली दिसत आहे.
मल्हारपेठ विभागातील एका गावातील युवकाला आठ दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरूवातीला त्याला सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. लक्षणे तिव्र नसल्यामुळे घरीच त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी रात्री अचानक त्याला दम लागण्यास सुरूवात झाली.
त्यामुळे काही युवकांनी त्याला पाटण येथील कोविड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. मात्र, मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आॅक्सिजन लावला. तसेच संबंधित युवकाला व्हेंटीलेटर बेडची आवश्यकता असल्यामुळे नातेवाईकांना त्याबाबत सांगण्यात आले.
नातेवाईक तसेच मित्रांनी सातारा, कऱ्हाडमध्ये व्हेंटीलेटर बेड मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोठेही बेड उपलब्ध झाला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता व्हेंटीलेटर बेडअभावी त्या तरूणचा दुर्दैवी मृत्यु झाला.
संबंधित युवक हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता. पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून त्याने व्यवसाय सुरू केला होता. मात्र, ऐन उमेदीत त्याच्यावर कोरोनारूपी काळाने घाला घातला.