निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 21:52 IST2022-07-28T21:50:10+5:302022-07-28T21:52:01+5:30
Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले.

निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका
सातारा : ‘पालिकेची निवडणूक जवळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाली आहे. विकासाची खोटी स्वप्ने दाखविण्याचे दिवस आता संपले असून, सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालयात मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन कास बंदिस्त जलवाहिनी व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले. उदयनराजेंच्या या दिल्ली निवेदनावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रक काढून जोरदार टीका केली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, पालिका निवडणूक आली की मंजूर नसलेल्या, न होणाऱ्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे.
मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत. वास्तविक कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू झाल्यानंतर पालिकेने वाढीव जलवाहिनीचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.
सातारा पालिकेला अक्षरश: लुटणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत. ज्यावेळी निधीअभावी कास प्रकल्पाचे काम थांबले होते, त्यावेळीच वाढीव जलवाहिनीचा प्रस्ताव शासनाकडे सादर व्हायला हवा होता. पण, त्यावेळी यांना कशाचेच काहीही देणेघेणे नव्हते. हे आणि प्रशासन झोपा काढत होते. ज्यात पैसे आहेत त्यातच यांना रस असतो, हे सातारकरांना केव्हाच कळून चुकले आहे.
तुमच्या पापाचा घडा भरला...
पाईपलाईनचे काम मंजूर व्हायला वर्ष लागणार, त्यानंतर काम सुरू होणार आणि पूर्ण कधी होणार? तोपर्यंत सातारकरांना कासच्या पाण्याचे स्वप्न फक्त बघतच बसावे लागणार आहे. धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केले. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून, सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे.