सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून अकराव्यादिवशी ही यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचली आहे. खासदार उदयनराजे भोसलेंच्या सातारा जिल्ह्यात अमोल कोल्हे सरकारवर टीका करत होते. जिल्ह्यातील उंब्रज येथे कोल्हेंची गर्जना सुरू होती. मात्र, राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असलेले उदयनराजे या यात्रेच्या ना स्वागताला दिसले ना शिवस्वराज्य यात्रेत सहभागी दिसले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही अप्रत्यक्षपणे नाराजी दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन केल्यानंतर, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाच या यात्रेचे ब्रँड अॅम्बेसिडर केले होते. त्यामुळे डॉ. अमोल कोल्हे हे पहिल्या दिवसापासून यात्रेला उपस्थित आहेत. पण, उदयनाराजे अद्यापही या यात्रेकडे फिरकलेच नाहीत. शिवस्वराज्य यात्रा आज 29 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यात दाखल झाली. सकाळी 10 वाजता नियोजित वेळेप्रमाणे या यात्रेने कराड येथील प्रीतीसंगम या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पुढील दौऱ्याला सुरुवात झाली. मात्र, साताऱ्याचे खासदार महाराज उदयनराजे भोसले या यात्रेच्या भेटीला आले नाहीत. राष्ट्रवादीने बनविलेल्या बॅनर्समध्येही उदयनराजेंचा फोटो आहे. मात्र, उदयनराजेंनी इकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.
दरम्यान, उदयनराजे भोसले आणि रामराजे निंबाळकर हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उदयनराजे यांनी शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ फिरवली असून राष्ट्रवादीसाठी ते नॉट रिचेबल असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच, साताऱ्यात शिवस्वराज्य यात्रा येऊनही उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं स्वागत सोडाच, पण भेटही घेतली नसल्याचे दिसून येते.